

पणजी : पुढारी वृत्तसेवा
हडफडे येथील नाईट क्लबमध्ये अग्निकांड होऊन २५ जणांचा बळी गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने यापुढे अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी नाईट क्लब, रेस्टॉरंट आदी ठिकाणी फटाके किवा ज्वालाग्रही वस्तू वापरण्यावर बंदी घातली आहे.
उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी तसा आदेश काढला आहे. राज्यातील नाईटक्लब, बार आणि रेस्टॉरंटस्, हॉटेल्स, गेस्टहाऊस आणि रिसॉर्टस्, बीच शॅक आणि तात्पुरत्या संरचना आणि कार्यक्रम स्थळे आणि मनोरंजन आस्थापनांसह परंतु त्यापुरते मर्यादित नसलेल्या पर्यटन आस्थापनांमध्ये फटाके, आतिषबाजी उपकरणे, स्पार्कलर, ज्वालाग्रही वस्तू, धुराचे परिणाम किंवा तत्सम आग/धूर निर्माण करणारी ज्वालाग्रही उपकरणे वापरणे, फोडणे, प्रज्वलित करणे किंवा चालवणे यावर प्रतिबंध लादले आहेत.
संपूर्ण उत्तर गोवा जिल्ह्यात हा आदेश लागू राहील, असे उत्तर गोवा न्यायदंडाधिकाऱ्यानी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
या आस्थापनांना आदेश लागू
ही बंदी सर्व आयोजक, कार्यक्रम व्यवस्थापक, व्यक्ती, संस्था, नाईटक्लब, बार आणि रेस्टॉरंटस्, हॉटेल्स, गेस्टहाऊस आणि रिसॉर्टस, बीच शॅक आणि तात्पुरत्या संरचना आणि कार्यक्रम स्थळे आणि मनोरंजन आदी आस्थापनांना लागू राहील, असेही न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.