

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मांडवी नदीत नव्या उच्च-क्षमतेच्या कॅसिनो जहाजाला प्रवेश देण्यावरील अंतरिम स्थगिती आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पुढील आदेशापर्यंत कायम ठेवला आहे. त्यामुळे सध्या मुरगाव बंद प्राधिकरणाच्या कक्षेत असलेल्या या कॅसिनो जहाजाला खंडपीठाच्या आदेशाशिवाय मांडवी नदीत आणता येणार नाही.
या प्रकरणात याचिकाकर्ते इनफ इज इनफ संस्थेला प्रतिवादी कॅसिनो कंपनीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर पुनरुत्तर (रिजॉईंडर) दाखल करण्यासाठी न्यायालयाने मुदत दिली. त्यानंतर पुढील सुनावणी १८ ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली आहे. त्या दिवसापर्यंत अंतरिम स्थगिती आदेश लागू राहणार आहे. वहनक्षमता, ही याचिका नव्या सुमारे २,००० प्रवासी क्षमतेच्या कॅसिनो जहाजाच्या मांडवी नदीतील प्रवेशाला आव्हान देणारी असून,
पर्यावरणीय परिणाम, नदीची जलवाहतुकीवरील परिणाम आणि आवश्यक परवानग्यांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यापूर्वीही न्यायालयाने आवश्यक प्रमाणपत्रे व न्यायालयाची परवानगी मिळेपर्यंत जहाजाला मांडवी नदीत प्रवेश किंवा संचालनास मनाई केली होती. आजच्या या आदेशामुळे नव्या कॅसिनो जहाजाच्या मांडवी नदीतील प्रवेशाला पुन्हा एकदा ब्रेक लागला असून, आता सर्वांचे लक्ष १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे लागले आहे.