

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मोबाईलच्या आहारी जाऊन मुलांचे अभ्यासाकडे होत असलेले दुर्लक्ष व घरात वाढलेली चिडचिड आणि काहीजणांकडून होणारा सोशल मीडियाचा गैरवापर याला आळा घालण्यासाठी १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावरील नको ते अॅप वापरण्यास बंदी घालण्याचा विचार केंद्र व राज्य सरकार करत आहे.
त्याबाबत गोव्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री रोहन खंबटे यांनी अलीकडेच माहिती दिली होती. तज्ज्ञांची समिती स्थापून याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी केंद्राला अहवाल पाठवला जाईल, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर पालकांकडून खंवटे यांच्या या विधानाचे स्वागत करण्यात येत आहे.
मुलांकडून मोबाईलचा अतिवापर व रात्री उशिरापर्यंत जागरण आणि अभ्यासावर व तब्येतीवर परिणाम ही आज प्रत्येक घरातील पालकांची महत्त्वाची अशी समस्या ठरली आहे. अनेक घरात एकुलते एक मूल असल्यास मोबाईल काढून घेणे, रागावणे या गोष्टी पालक करू शकत नाहीत.
समजावूनही मुले मोबाईलचा अतिवापर कमी करत नाहीत. त्यामुळे निदान मोबाईलवरील विद्यार्थ्यांना नको त्या गोष्टी (अॅप) बंद केल्यास मुलांचे अभ्यासात लक्ष लागण्याची शक्यता गृहीत धरून सरकारतर्फे १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी तथा अभ्यासापासून दूर नेणारे अॅप बंद करण्याची योजना केंद्र व राज्य सरकारने आखली आहे.
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढतेय :
गौरेश गावस १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध आणण्याचा सरकारचा विचार हा योग्य आहे. विद्यार्थी सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे व्यसनाधीन होत आहेत. ज्याचा त्यांच्या अभ्यासावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. एकाग्रता कमी होणे, चुकीची माहिती मिळणे आणि सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढणे ही गंभीर समस्या आहे.
तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांचा गैरवापरही काही ठिकाणी होत असल्याचे आढळते. लहान वयात योग्य मार्गदर्शन नसल्यास मुलांची विचारशक्ती व सर्जनशीलता कमी होऊ शकते. म्हणून ठराविक वयोगटासाठी नियंत्रण व पालकांचे मार्गदर्शन आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर व्हावा यासाठी सरकारचा हा निर्णय समाजहिताचा ठरू शकतो.
लवकरात लवकर नियम लागू व्हावा
पल्लवी गावस मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी सरकारने केलेला १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या वापरला बंदी घालण्याचा विचार योग्य आहे.
कारण, त्यामुळे मुलांचे सायबर गुन्हेगारी पासून संरक्षण होईल तसेच मुलांच्या मानसिक आरोग्यावर होणारा नकारात्मक परिणाम यापासून सुटका होईल.
तसेच मुलांचे स्क्रीन टाईम कमी झाल्यामुळे मुले शारीरिक उपक्रमात व्यस्त होतील, त्यामुळे सरकारच्या या विचारांचे स्वागत होईल. सरकारने वेळ न दवडता लवकरात हा नियम लागू करावा.
मानसिक आरोग्य संतुलित राहील
प्रा. विशांत नाईक मोबाईलचा वापर हा दुसऱ्याचा फोन घेण्यासाठी आणि दुसऱ्याला फोन करण्यासाठी करायचा असतो, सध्या आई-वडिलांचा फोन त्यांच्या मुलांकडेच जास्त दिसतो. मुले जेवताना, झोपताना, अभ्यास करताना मोबाईल घेऊन बसतात. त्यामुळे लहान वयात पुष्कळ आजारांना सामोरे जावे लागू शकते.
तसेच त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम झालेले दिसतात. मोबाईलमुळे मुलांचे आरोग्य धोक्याचे झाले आहेत. त्यासाठी गोवा सरकारने सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालावी जेणेकरून त्यांचे मानसिक आरोग्य संतुलित राहणार
तर गोवा ठरेल पहिले राज्य
गोव्यातील शिक्षक, पालक, शिक्षण तज्ज व संबंधितांची बैठक घेऊन एक समिती तयार करून या विषयावर एक अहवाल तयार करून तो केंद्राकडे पाठवला जाईल, नंतर राज्यात १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी लागू होईल. तसे झाले तर अशी बंदी लागू करणारे गोवा पहिले राज्य ठरू शकते.