

पणजी : पुढारी वृत्तसेवा
हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईटक्लबच्या परवाना प्रक्रियेत कथित बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी नाईटक्लब मालक सौरभआणि गौरव लुथरा याना मंजूर करण्यात आलेला जामीन रद्द करण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती गोवा सरकारने गुरुवारी (७ एप्रिल) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला अजय गुप्ताच्या अर्जावरील सुनावणीवेळी दिली.
ही माहिती राज्य सरकारतर्फे दाखल करण्यात आलेल्या आणखी एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान देण्यात आली. या याचिकेत सहआरोपी आणि व्यावसायिक भागीदार अजय गुप्ता याला मिळालेला जामीन रद्दची मागणी केली आहे. अजय गुप्तावर नाईटक्लबसाठी मद्य परवाना मिळवण्यासाठी बनावट ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) तयार करून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले की, अजय गुप्ताचा जामीन रद्द करण्याच्या प्रयत्नांबरोबरच, त्याचा परवाना मंजुरी प्रक्रियेशी संबंधित बनावट कागदपत्र प्रकरणात लुथरा बंधूंना मिळालेल्या जामिनालाही आव्हान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याची भूमिका नोंदवून उच्च न्यायालयाने सरकारला परवानगी दिली की, सुट्टीच्या कालावधीत नवीन याचिका दाखल केल्यास हे प्रकरण सुट्टीकालिन खंडपीठासमोर उल्लेख करता येईल.