

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील शेती आणि फलोत्पादन क्षेत्राचे करण्यासाठी संरक्षण कृषी संचालनालयामार्फत ३४ राज्यस्तरीय योजना, १५ केंद्र पुरस्कृत योजना आणि ४ केंद्रीय क्षेत्रीय योजना राबविण्यात येत आहेत.
याशिवाय वाळपई येथे नवीन विभागीय कृषी कार्यालयाची इमारत जवळपास पूर्णत्वास आली असून ती लवकरच शेतकऱ्यांसाठी कार्यान्वित करण्यात येणार आहे. या कार्यालयामुळे सत्तरी तालुक्यातील शेतीला चालना मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
सत्तरी तालुक्यातील शेतकऱ्यांना कुंपण, सिंचन सुविधा व शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याबाबत सरकारने कोणती पावले उचलणे गरजेचे आहे, याकडे लक्ष वेधत आमदार डॉ. देविया राणे यांनी सभागृहात शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
त्यानंतर सदर मुद्द्यावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली मानव संसाधन विकास योजना, शेतकरी आधार निधी, राज्य कृषी पुरस्कार, विशेष कृषी पुरस्कार, शेती आणि संलग्न उपक्रमांसाठी कर्जावरील व्याज अनुदान, फलोत्पादन विकास योजना, अशा विविध योजनांची यादीच वाचून मुख्यमंत्र्यांनी आमदारांना त्यांच्या मतदारसंघात समुदाय शेती प्रकल्पांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले.
या योजनेत सरकार ७० टक्के खर्च उचलेल, तर उर्वरित ३० टक्के खर्च शेतकऱ्यांकडून केला जाईल. यासाठी साखळी मतदारसंघातील सुर्ला आणि कुडणे येथे प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. आमदार विजय सरदेसाई यांनी आमदार निधीचा वापर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीच केला जावा, अशी मागणी केली.
कोमूनिदाद जमिनीवर समुदाय शेती सुरू केल्यास गोव्यातील शेतीला पुन्हा चालना मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. तर आमदार प्रेमेंद्र शेट यांनी वन्य प्राण्यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. शेतजमिनीभोवती कुंपण किंवा कंपाउंड उभारणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत खर्चिक असल्याने या संदर्भात सरकारने स्वतंत्र योजना सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार अपयशी
दरम्यान, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, विशेषतः महिला शेतकऱ्यांना आवश्यक मदत देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. पर्यटन आणि रिअल इस्टेट क्षेत्राकडे जास्त लक्ष दिल्यामुळे गोव्यातील शेती हळूहळू घटत असल्याचा आरोप त्यांनी केला