

केरी : पुढारी वृत्तसेवा
हिमालयाच्या कुशीत वसलेल्या अत्यंत कठीण आणि धोकादायक मानल्या जाणाऱ्या श्रीखंड महादेव ट्रेकवर साखळीतील हर्षदा भिकाजी पेडणेकर हिने यशाची झेप घेत गोव्याचे नाव उंचावले आहे. सध्या पुणे येथे इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेली हर्षदा हिने बर्फाच्छादित शिखरे, खोल दऱ्या आणि थरकाप उडवणाऱ्या हवामानाशी संघर्ष करत ५,२२७ मीटर उंचीवरील हा अवघड ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला.
हिमाचल प्रदेशातील पंच कैलासांपैकी एक मानल्या जाणाऱ्या श्रीखंड महादेव ट्रेकला भारतातील सर्वात कठीण ट्रेकपैकी एक मानले जाते. सुमारे १७,१५० फूट उंचीवर असलेला हा ट्रेक हर्षदाने २५ जून २०२६ रोजी यशस्वीरित्या पूर्ण केला. तीन दिवसांची चढाई आणि दोन दिवसांचा उतार असा एकूण पाच दिवसांचा खडतर प्रवास तिने पूर्ण केला.
या काळात तिने सुमारे ७० किलोमीटरचे अंतर दाट जंगल, बर्फाच्छादित मार्ग, हिमनद्या, उभ्या दगडी कडे आणि धोकादायक वळणांमधून पार केले. प्रवासादरम्यान तापमान ०० ते -१४° सेल्सिअसपर्यंत खाली गेले होते. अतिशय प्रतिकूल हवामान, गोठवणाऱ्या रात्री आणि सतत बदलणाऱ्या परिस्थितीतही हर्षदाने हार न मानता आपला प्रवास सुरू ठेवला. आध्यात्मिक अनुभूती, स्वतःच्या शारीरिक व मानसिक क्षमतेची परीक्षा आणि गोव्याचे नाव उज्ज्वल करण्याचा निर्धार या प्रेरणेतून तिने हा कठीण टप्पा पूर्ण केला.
या ट्रेकदरम्यान तिने स्वतःला दिलेले वचन पूर्ण करत श्रीखंड महादेव शिखरावर पोहोचून भगवान शिवाचे दर्शन घेतले. हर्षदाने यापूर्वीही उल्लेखनीय ट्रेक पूर्ण केले आहेत. मागील वर्षी तिने आदि कैलास यात्रा पूर्ण केली असून, पंच केदारांपैकी चार केदारांचे दर्शनही तिने केले आहे. महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि गोव्यातील अनेक पर्वतशिखरेही सर केली आहेत.
श्रीखंड महादेव ट्रेक हा केवळ साहसी प्रवास नसून श्रद्धा, धैर्य आणि आत्मशोधाचा अनुभव आहे. असे मानले जाते की येथे भगवान शिव ध्यानस्थ अवस्थेत आहेत. त्यामुळे हा ट्रेक फक्त साहसी नसून एक आध्यात्मिक यात्राही मानली जाते. दरवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यातच हा ट्रेक खुला असतो, कारण त्यानंतर बर्फवृष्टी आणि प्रतिकू हवामानामुळे मार्ग बंद होतो.
जावन गावातून सुच होणारा हा ट्रेक सिंहगड, थाच, भीमद्वार, पार्वती बाग यांसारख्या कॅम्पिंग पॉइंट्समधून जात शेवटी श्रीखंड महादेव शिखरावर पोहोचतो. सुम ५५ ते ७० किलोमीटरचा हा प्रवास अत्यंत खडत असून, अरुंद वाटा आणि बर्फाच्छादित कड्यांमुळे तो अधिक धोकादायक मानला जात.
कामगिरीचे कौतुक; शुभेच्छांचा वर्षाव
हर्षदाच्या या ऐतिहासिक कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून ती अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. या यशामुळे साखळीतील तिने गोव्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे नाव हिमालयाच्या उंच शिखरांवर पोहोचवले आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.