

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील विदेशी विभागीय नोंदणी कार्यालयाने (एफआरआरओ) या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत राज्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या ४३ परदेशी नागरिकांना माघारी पाठवले. यामध्ये केवळ जून महिन्यात परत पाठवण्यात आलेल्यांमध्ये १४ जणांचा समावेश आहे. परत पाठवण्यात आलेल्यांमध्ये नायजेरियन नागरिक असलेल्या एका महिलेचाही समावेश होता.
ती गोव्यात येण्यापूर्वी जवळपास ११ वर्षे दिल्लीत राहत होती. गोव्यात आल्यावर ती इतर नायजेरियन नागरिकांना जेवण पुरवण्याचे काम करत होती. परत पाठविलेल्यांमध्ये रशियाचे नागरिक सर्वाधिक (१४) होते. त्यानंतर बांगलादेश (८) आणि युगांडा (८) येथील नागरिकांचा क्रमांक आहे.
एफआरआरओने इराण, बेलारूस, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, युक्रेन, उझबेकिस्तान आणि केनिया येथील नागरिकांनाही परत पाठवले आहे. २०२२ ते २०२५ या काळात गोव्यात परदेशी नागरिकांविरुद्ध घडलेल्या गुन्ह्यांच्या तुलनेत, त्यांनी स्वतः केलेले गुन्हे सहा पटींहून अधिक होते.
'नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो'च्या आकडेवारीनुसार गोवा पोलिसांनी २०२२ ते २०२४ या काळात परदेशी नागरिकांशी संबंधित २५१ गुन्हे नोंदवले. यापैकी २०६ प्रकरणांमध्ये परदेशी नागरिक आरोपी होते, तर ४५ प्रकरणांमध्ये ते पीडित होते. मुदत संपल्यानंतरही वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्धची मोहीम सुरूच राहणार आहे.
बेकायदेशीर व्यवसायात सहभाग
दरम्यान, मुदत संपल्यानंतरही भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांपैकी बहुतांशजण बेकायदेशीर व्यवसायांमध्ये गुंतलेले असतात. बहुतांश परदेशी नागरिक पर्यटक व्हिसावर भारतात येतात, तर काहीजण व्यावसायिक व्हिसावर येतात, परंतु त्यांचा मूळ उद्देश भारतातच वास्तव्य करण्याचा असतो, असे पोलिसांनी सांगितले.
विविध गुन्ह्यांत अटक
देशभरात, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दंगल, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, फसवणूक, परदेशी नागरिक कायदा अंतर्गत गुन्हे, अनैतिक मानवी तस्करी अमलीपदार्थ बाळगणे व त्यांची विक्री, तसेच चोरी यांसारख्या गुन्ह्यांमध्ये परदेशी नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत किंवा त्यांना अटक करण्यात आली आहे.