

पणजी : पुढारी वृत्तसेवा
ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर सरकारने सामान्य लोकांसाठी वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडरची योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत तीन हजार रुपयांची रक्कम गणेश चतुर्थीपूर्वी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, अद्याप ही रक्कम खात्यात जमा झालेली नाही. एकाचवेळी शेकडो अर्जांची पडताळणी करण्यास विलंब होत असल्याने रक्कम जमा होण्यास उशीर लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप सरकारने गोव्यातील गॅस ग्राहकांना तीन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली होती. मात्र, ही योजना लागू करण्यास साडेचार वर्षे लागली. योजना लागू केल्यानंतर अर्ज भरल्यापासून काही दिवसांतच रक्कम गॅस ग्राहकाच्या किंवा त्याच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा होईल, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले होते.
गणेशचतुर्थीपूर्वी रक्कम न मिळाल्याने सरकारच्या आश्वासनाबाबत ग्राहकांमध्ये नाराजी आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीत सुरुवातीपासूनच अनेक त्रुटी राहिल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला. गॅस बुक नोंदणी पुरुषाच्या नावावर असली तरी त्याच्या पत्नीच्या नावाने योजनेचा अर्ज भरावा, असे सांगण्यात आले होते.
तरीही काहींनी गॅस नोंदणी ज्याच्या नावावर आहे, त्याच्याच नावाने अर्ज भरले. काही पंचायतींनी असे अर्ज स्वीकारले नाहीत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण देत सर्व अर्ज स्वीकारण्यात येतील, असे सांगावे लागले.
त्यामुळे अर्ज भरण्यासाठी नागरिकांची धावपळ झाली.
ही योजना सरकार बंद करणार नाही. भाजप सरकारच्या काळात सुरू झालेली कोणतीही योजना बंद झालेली नाही; मात्र मानधन अथवा योजनेची रक्कम मिळण्यास उशीर होऊ शकतो, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.