

पणजी : पुढारी वृत्तसेवा
यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत गोवा अग्निशमन दल संचालनालकडे आगीचे तसेच बिगर आगीच्या घटनांचे ४७५३ कॉल्स नोंद झाले. सरासरी प्रतिदिन ८ घटना घडल्या आहेत. या एकून नोंद झालेल्या घटनापैकी ३२ कॉल्स भीषण आर्गीचे होते त्यामध्ये सुमारे ७.६ कोटींचे नुकसान झाले तर सुमारे ३६ कोटींची मालमत्ता वाचवण्यात दलाला यश आले. आगीच्या घटनांमध्ये तिघांचा इतर घटनांत सुमारे २० जणांचा जीव वाचवण्यात आल्याची माहिती दलाचे संचालक नितीन रायकर यांनी दिली.
दलाकडे भीषण तसेच इतर आर्गीचे मिळून २३७८ तर बिगर आगीचे २३७५ कॉल्स आले आहेत. या घटनांमध्ये ३५.८८ कोटींची आगीच्या प्रकरणातील मालमत्ता दलाने वाचविली तर बिगर आगीच्या घटनांमधील ३.५७ कोटींची मालमत्ता वाचविली आहे. याव्यतिरिक्त विहिरींमध्ये जनावरे पडण्याच्या घटनांमध्येही दलाच्या जवानानी मोठ्या धाडसाने त्याना जीवदान दिले आहे. राज्यात अनेक भागात बेकायदेशीर भंगार अड्डे उभे राहिले आहेत.
ते धोकादायक बनले असून सांकवाळ तसेच कोलवाळ येथे भंगार अड्ड्यांना लागलेल्या घटना भयानक आहेत. या भंगार अड्ड्यांकडून सुरक्षिततेसंदर्भात कोणती उपाययोजना घेतली आहे का याची तपासणी सुरू आहे. आगीच्या घटनांची नोंद झाल्यानंतर नुकसान झालेल्याची माहिती संबंधित मालकाकडून देण्यास विलंब होतो.
कुंडई येथील औद्योगक वसाहतीमध्ये इंपेरियल डिस्टीलरीज व विटनियर्स या कंपनीला लागलेली भीषण आग विझवण्यात दलाच्या जवानांना तारेवरची कसरत करावी लागली. या आगीत सुमारे ४.८० कोर्टीचे नुकसान झाले तरी सुमारे २७.२३ कोटींची मालमत्ता वाचवण्यात यश आले. म्हापसा येथे घराला लागलेल्या आगीत सुमारे एक लाखाचे नुकसान झाले मात्र ८ लाखाचे सामान वाचवण्यात आले. सांताक्कुझ येथे काबेसा वाडा येथे घर पूर्णपणे खाक झाले होते.
सुमारे १ कोटीहून अधिक सामानांचे नुकसान झाले होते. या घरातील कपडे तसेच इतर सामान खाक झाल्याने त्यांच्या डोक्यावर छप्परच राहिले नाही. जानेवारी ते जून २०२६ पर्यंत खोर्ली म्हापसा येथे घराला आग लागली होती. या महिन्यात रस्त्यावर उभी करून ठेवलेल्या कारने पेट घेतला होता. या घटनेत कारचे सुमारे ७.५७ लाखांचे नुकसान झाले होते. पर्रा बार्देश येथे घर आगीत लागून ४ लाखांचे नुकसान तर ५ लाखांची मालमत्ता वाचवण्यात आली होती.
हाऊसिंग बोर्ड म्हापसा येथे काजू झाडांना आग लागून दिड लाखाचे नुकसान तर २ लाखाची मालमत्ता वाचवण्यात यश आले होते. मावळींगे डिचोली येथे एका दुकानाला आग लागून सुमारे ५ लखांची मालमत्ता खाक झाली होती तर दलाला २ लाखांची मालमत्ता वाचवणे शक्य झाले होते.
ही घटना रात्रीची घडल्याने दलाला माहिती मिळेपर्यंत घटनास्थळी पोहचण्यास उशीर झाला मात्र ही आग आजुबाजूला कोठेही फैलू नये यासाठी दलाच्या जवानांनी योग्य ती काळजी घेतली. कळंगुट येथे एका कॉटेजला आग लागली मात्र खाक झालेल्या सामानांची किंमतअजूनही सादर केली नाही मात्र दलाने ३ लाखांची मालमत्ता वाचविली.
हणजूण, डिचोली, म्हापसा येथेही बचाव
हणजूण येथील अल्बाईल रेस्टॉरंटला आग लागून सुमारे ३ लाखांची मालमत्ता खाक झाली होती. दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग विझवून सुमारे १० लाखांची मालमत्ता वाचविली. वाहनांना आगी लागल्याच्या घटना घडल्या. त्यामध्ये डिचोली येथे कारला आग लागून सुमारे ५ लाखांचे नुकसान तर २ लाखांची मालमत्ता वाचवली. म्हापसा येथे साईबाबा मंदिराजवळ उभी केलेल्या कारला आग लागण्याची घटना घडली होती. या आगीत सुमारे २ लाखांचे नुकसान झाले. ही कार दलाचे जवान पोहचेपर्यंत खाक झाली होती.
सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार : रायकर
गोवा अग्निशमन दलाच्या प्रत्येक स्थानकात आवश्यक उपकरणे तसेच वाहनांची सोय करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाला कॉल आल्यापासून काही मिनिटांच घटनास्थळी पोहचून मालमत्ता वाचवण्याचे प्रयत्न केले गेले आहे. अत्याधुनिक उपकरणे असलेले पाण्याचे बंबही खात्याकडे असल्याने आग आटोक्यात आणण्यात मदत होते. सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत त्यानुसार तपासणी करण्यात येत, अशी माहिती अग्निशमन दलाचे संचालक नितीन रायकर यांनी दिली.