

पणजी : पुढारी वृत्तसेवा
फातोर्डा येथील २०२० मधील गाजलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अर्जुन काझिडोनी याची निर्दोष मुक्तता करत सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द केली आहे.
सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यापूर्वीच निधन झाल्याने दोष सिद्ध करण्यासाठी पुरेसे नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. हे प्रकरण फेब्रुवारी २०२० मध्ये घडलेल्या घटनेशी संबंधित आहे.
मद्यपानादरम्यान दारू वाटून घेण्यावरून झालेल्या वादानंतर आरोपी अर्जुन याने दगडाने ठेचून व दारूच्या बाटलीने हल्ला करून भीमसी गस्ती आणि मुतन्ना सिदप्पा बडिगर यांची हत्या केल्याचा तसेच सुनील सावंत यांच्यावरील हल्लाप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
फातोर्डा पोलिसांनी या घटनेप्रकरणी प्रत्यक्षदर्शी सुनील सावंत यांची जबानी तसेच त्याने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेली जबानीच्या आधारे आरोपी अर्जुन याच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्याच्या दरम्यान सुनील सावंत यांचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांची साक्ष न्यायालयात नोंद झाली नव्हती.
त्याच्याव्यतिरिक्त प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीच नव्हता. आवश्यक पुराव्यांनिशी गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने ऑक्टोबर २०२४ मध्ये अर्जुन काझिडोनीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.