

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-६ (एनएफएचएस-६) नुसार गोव्यात प्रौढांमध्ये उच्च रक्तशर्करेचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील जवळपास तीनपैकी एका व्यक्तीमध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढलेली असून जीवनशैलीशी संबंधित आजारांचा वाढता भार या निष्कर्षांतून स्पष्ट होत आहे.
सर्वेक्षणानुसार गोव्यातील २७.५ टक्के महिला आणि ३२.१ टक्के पुरुष यांची रक्तातील साखरेची पातळी १४० 98 मिग्रॅ./डेसिलिटरपेक्षा अधिक आहे किंवा ती नियंत्रणात ठेवण्यासाठी ते औषधोपचार घेत आहेत. तसेच राज्यातील ४५.१ टक्के महिला आणि ४३.६ टक्के पुरुष हे जादा वजनाचे किंवा लठ्ठ असल्याचेही आढळून आले आहे.
शहरी भागांमध्ये ही समस्या अधिक गंभीर असून ४८.३ टक्के महिला आणि ४४.१ टक्के पुरुष जादा वजन किंवा लठ्ठपणाच्या श्रेणीत येतात. गोव्यातील ही आकडेवारी राष्ट्रीय सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. देशपातळीवर १७.८ टक्के महिलांमध्ये आणि २०.९ टक्के पुरुषांमध्ये रक्तातील साखरेची पातळी १४० मिग्रॅ./डेसिलिटरपेक्षा अधिक असल्याचे किंवा ते मधुमेह नियंत्रणासाठी औषध घेत असल्याचे आढळून आले आहे.
अहवालात पुरुषांमध्ये तंबाखू आणि मद्यपानाचे प्रमाण महिलांच्या तुलनेत अधिक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. जीवनशैलीतील बदल, अपुरी शारीरिक हालचाल आणि वाढते स्थूलत्व यामुळे मधुमेह आणि इतर असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
गोव्यात मधुमेहाचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त
तीन वर्षांपूर्वी 'लॅन्सेट डायबेटिस अँड एंडोक्रायनोलॉजी' या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित झालेल्या आयसीएमआर-इंडियाब या राष्ट्रीय अभ्यासातही गोव्यात मधुमेहाचे प्रमाण देशातील सर्वाधिक असल्याचे नमूद करण्यात आले होते. या अभ्यासानुसार गोव्यात मधुमेहाचे प्रमाण २६.४ टक्के असून प्रीडायबेटिसचे प्रमाण २०.३ टक्के आहे. राष्ट्रीय स्तरावर मधुमेहाचे सरासरी प्रमाण सुमारे २० टक्के असल्याने गोव्याची स्थिती अधिक गंभीर मानली जात आहे.