

मयुरेश वाटवे
गेल्या आठवड्यात ज्येष्ठ नागरिकांसंबंधी ऐकलेल्या, वाचलेल्या बातम्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांची काळजी आणि सुरक्षा हे येत्या काळात सरकारसमोरील एक मोठे आव्हान ठरणार आहे. गोव्यासारखे सुशिक्षित राज्य या दृष्टीने नक्कीच काम करू शकेल. प्रोव्हेदोरियासारख्या राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण संस्थेने वेगळ्या पद्धतीने या समस्येकडे पाहायला हवे.
ज्या मुलांना बोट धरून चालायला शिकवले, ती मुले म्हातारपणाची काठी होण्याऐवजी आपल्यावरच काठी उगारत चालून येतील अशी अपेक्षा कोणताही पालक करणार नाही. पण दुर्दैवाने ती परिस्थिती ओढवली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात सून सासऱ्याला चपलेने मारताना दिसतेय तर मुलगाही त्यांना वारंवार थपडा मारताना दिसतो आहे. परदेशी राहाणाऱ्या मुलीला पोलिसांत एफआयआर दाखल करण्याची पाळी आली आहे.
ही केवळ सुटी घटना आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ती व्हायरल झाली म्हणून लक्षात आली. पण समोर न आलेल्या आणि असा छळ सोसत जीवन कंठणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे अनेक किस्से आहेत. कधी हतबलता तर कधी आपल्याच मुलांविरोधात बोललो तर समाज काय म्हणेल ही भीती आहे.
भारतीयांना मुले मोठी झाल्यावर कधी एकदा त्यांच्या हातात घराचा कारभार सोपवतो आणि आपण निवृत्ती घेतो असे होत असते. आजपर्यंत आपण मुलांची काळजी घेतली आता थोडी त्यांनीही आमची काळजी घेऊ दे, ही उदार भावनाही असते. आज माणसाचे आयुर्मान वाढले आहे. निवृत्तीनंतरचा मोठा काळ आनंदाने घालवूया ही इच्छा असते. पण दुर्दैवाने आपल्या आर्थिक नाड्या-शेंड्या मुलांच्या हाती देणे घातक ठरत आहे. यात सर्वच मुलांना दोष देण्याचा उद्देश नाही. खूप सन्मान्य अपवाद असतातच.
एका ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात एक वेगळी समस्याही ऐकायला मिळाली. ९३ वर्षांच्या वृद्ध आईची सेवा करणाऱ्या सत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ही कैफियत आहे. आई दिवसभर गादीवरच असते. कारण तिला चालता फिरता येत नाही. तिला लघवी संडासासाठी उचलून न्यावं लागतं. तो म्हणतो, आईला शंभरी पार करण्याचा खूप उत्साह आहे.
पण माझे वय आता सत्तरीला पोचले आहे. तिची सेवाशुश्रुषा करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. माझ्याकडून होत नाही म्हणून मी टाकूही शकत नाही. वृद्धत्वाच्या समस्या अशा बहुपेडी आहेत. काही वेळा भावना बाजूला ठेवून समंजसपणा दाखवावा लागतो. प्रत्येक प्रकरणात समस्या, अडचणी वेगळ्या असतात.
गोव्यात झपाट्याने ही समस्या वाढतेय. त्याकडे फार काळ आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. वृद्धत्व ही समस्या नाही. समस्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेची आहे. नुवे येथे ८५ वर्षे वयाच्या वृद्धेवर झालेला बलात्काराचा प्रयत्न आपले डोळे खाडकन उघडणारा आहे. जन्माला आलेल्या चिमुरडीपासून ८५ वर्षांच्या आजीपर्यंत कोणीच सुरक्षित नाही हा विचार अंगावर काटा आणणारा आहे. ऑनलाईन फ्रॉड करणारे ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करत असल्याच्या बातम्या सातत्याने येत असतात.
गोव्यात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण वाढतेय तसेच त्याच्यासोबत येणाऱ्या अल्झायमर, डिमेन्शिया सारख्या आजारांचे वाढते प्रमाणही चिंताजनक आहे. अलीकडेच विविध कोर्टांनी दिलेले काही निकाल दिलासा देणारे आहेत. वृद्ध आई वडिलांची काळजी घेणे ही मुलांची जबाबदारी आहे, असा निवाडा एका न्यायालयाने दिला आहे. मालमत्ता नावावर केल्यावर आई वडिलांचा छळ करणाऱ्या मुलांना आई वडिलांचे घर सोडून जाण्याचे आदेशही दिलेले आहेत. आणखी एका खटल्यात नावावर केलेली मालमत्ता परत घेण्याचे आदेशही दिले आहेत.
अनेक मुले परदेशात व त्यांचे आई वडील गावात अशी परिस्थिती झाल्यामुळे गोव्यात वृद्धांची संख्या वाढत आहे. सरकार युवकांसाठी अनेक कार्यक्रम, उपक्रम राबवत असते तसेच आता ज्येष्ठ नागरिकांसाठी करणे काळाजी गरज ठरणार आहे. सरकारसाठी हा चिंतेचा विषय असायला हवा. डिचोलीतील सेकंड इनिंगसारखे क्लब गावागावात तयार झाले पाहिजेत. जिथे समवयीन ज्येष्ठ नागरिकांना एकत्र वेळ घालवता येईल. मग ते टीव्ही बघणे असो, वाचन असो, बैठे खेळ असोत किंवा नुसत्याच गप्पागोष्टींसाठी एकत्र येणे असो.
पंचायत पातळीवर गावातील वृद्धांची जनगणना केली गेली पाहिजे. आर्थिक स्थिती चांगली नसल्यास सरकारने त्यावर काही उपाय शोधले पाहिजेत. जे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांच्याकडून किंवा त्यांच्या मुलांकडून मासिक फी घेता येईल. प्रोव्हेदोरियासारख्या गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण संस्थेने नव्याने अशा समस्येकडे पाहिले पाहिजे. आता ही समस्या केवळ रस्त्यांवर दुर्लक्षित निराधारांपुरता मर्यादित राहिलेली नाही. त्याची व्याप्ती वाढली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक तर सोय होत असेल तर पैसे द्यायलाही तयार असतात. पण अजून या समस्येकडे म्हणावे तसे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. ना समाजाने ना सरकारने.
वृद्धत्वाकडे झपाट्याने वाटचाल करणाऱ्या समाजाची आपण पुरेशी तयारी केलेली नाही. चांगल्या आरोग्य सुविधांमुळे लोकांचे सरासरी आयुर्मान वाढते, परंतु सन्मानाने जगण्याची खात्री देता येत नाही. साठीनंतर आणखी पंचवीस-तीस वर्षे जगणाऱ्या व्यक्तीला सुरक्षितता, मानसिक आधार, आरोग्यसेवा, सामाजिक सहभाग आणि आर्थिक स्थैर्य मिळेलच याची शाश्वती राहिलेली नाही. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे वृद्धांच्या देखभालीची जबाबदारी घरात विभागली जायची. आता मात्र वृद्ध दाम्पत्य किंवा एकाकी ज्येष्ठ व्यक्ती हे गोव्यातील वास्तव बनत आहे.
जगभरातील संशोधन सांगते की वृद्धांवरील अत्याचारांमध्ये केवळ अनोळखी व्यक्तींचा सहभाग नसतो. अनेकदा अत्याचार करणारी स्वतःची मुले, नातेवाईक किंवा काळजी घेणारे कर्मचारी असतात. मानसिक छळ, आर्थिक शोषण, औषधांची उपेक्षा, एकाकीपणा लादणे किंवा मालमत्तेसाठी दबाव टाकणे ही देखील अत्याचाराचीच रूपे आहेत. अलीकडील न्यायालयीन निर्णयांनी या वास्तवाकडे लक्ष वेधले आहे. परंतु न्यायालयीन निर्णय हा शेवटचा उपाय असतो. प्रश्न असा आहे की परिस्थिती त्या टप्प्यापर्यंत पोहोचूच नये यासाठी आपण काय करत आहोत?
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार २०५० पर्यंत जगातील प्रत्येक सहा व्यक्तींपैकी एक व्यक्ती साठ वर्षांवरील असेल. जपान, इटली, जर्मनी, दक्षिण कोरिया यांसारख्या देशांनी या वास्तवाला खूप आधी स्वीकारले आहे. त्यामुळे त्यांनी वृद्धांसाठी आरोग्य, वाहतूक, निवास, मानसिक आरोग्य, सामाजिक सहभाग आणि दीर्घकालीन काळजी याभोवती धोरणे विकसित केली आहेत.
जपानमध्ये ‘कम्युनिटी इंटिग्रेटेड केअर सिस्टीम’ विकसित करण्यात आली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना शक्य तितका काळ स्वतःच्या घरातच राहता यावे यावर भर दिला जातो. डॉक्टर, परिचारिका, फिजिओथेरपिस्ट, समाजकार्यकर्ते आणि स्वयंसेवक यांचे जाळे एकत्रितपणे काम करते. घरपोच आरोग्यसेवा, नियमित आरोग्य तपासणी, औषध व्यवस्थापन आणि मानसिक आधार या सर्व सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून दिल्या जातात.
डेन्मार्कमध्येही वृद्धाश्रम हा शेवटचा पर्याय मानला जातो. त्याऐवजी वृद्धांना त्यांच्या घरात राहूनच आवश्यक सेवा पुरवल्या जातात. घराची साफसफाई, स्वयंपाक, औषधे, वैद्यकीय तपासणी आणि दैनंदिन कामांमध्ये मदत करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नियमित भेट देतात. त्यामुळे वृद्धांचा आत्मसन्मान टिकून राहतो.
नेदरलँड्समध्ये डिमेन्शिया असलेल्या व्यक्तींसाठी लहान गावांसारखी संकल्पना विकसित करण्यात आली आहे. तेथे रुग्णांना हॉस्पिटलसारखे वातावरण न देता बाजार, बाग, कॅफे आणि घरे असलेल्या नैसर्गिक वातावरणात राहण्याची संधी दिली जाते. त्यामुळे त्यांची चिंता कमी होते आणि जीवनमान सुधारते.
सिंगापूरमध्ये वृद्ध पालकांच्या जवळ राहणाऱ्या मुलांना आर्थिक सवलती दिल्या जातात. ब्रिटनमध्ये ‘सोशल प्रिस्क्रायबिंग’ ही संकल्पना विकसित झाली आहे. डॉक्टर केवळ औषधे लिहून देत नाहीत, तर एकाकीपणाने त्रस्त असलेल्या वृद्धांना वाचन मंडळ, बागकाम, संगीत, व्यायाम गट किंवा स्वयंसेवी संस्थांशी जोडतात. संशोधनातून असे दिसून आले आहे की सामाजिक सहभाग वाढल्यास नैराश्य, चिंता आणि शारीरिक आजारांचे प्रमाणही कमी होते.
गोव्यात अशा अनेक कल्पना सहज राबविता येऊ शकतात. प्रत्येक पंचायत स्तरावर ज्येष्ठ नागरिकांची अद्ययावत नोंदणी असणे अत्यंत आवश्यक आहे. कोण एकटे राहतात, कोणाला नियमित औषधांची गरज आहे, कोणाला डिमेन्शिया किंवा अल्झायमर आहे, कोण आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे याची माहिती स्थानिक प्रशासनाकडे असणे आवश्यक आहे. नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आणीबाणी किंवा इतर प्रसंगी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
गोव्यातील अनेक गावे सामाजिकदृष्ट्या अजूनही एकमेकांशी जोडलेली आहेत. त्याचा उपयोग करून पंचायत स्तरावर स्वयंसेवक, आशा कार्यकर्त्या, सामाजिक संस्था आणि युवक मंडळांना जोडून ‘वृद्ध मैत्री’ उपक्रम राबविता येतील. आठवड्यातून एकदा घरी भेट देणे, औषधांची चौकशी करणे, किराणा आणून देणे किंवा फक्त अर्धा तास गप्पा मारणे इतकी साधी कृतीही एखाद्या वृद्धासाठी मानसिक आधार ठरू शकते. शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सामाजिक उत्तरदायित्वाच्या उपक्रमांतर्गत वृद्धांशी संवाद साधण्यास प्रोत्साहन देता येईल.
आज जगभर ‘केअर इकॉनॉमी’ हे वेगाने वाढणारे रोजगार क्षेत्र म्हणून उदयास येत आहे. वृद्धांची देखभाल करणारे प्रशिक्षित कर्मचारी, जेरियाट्रिक परिचारिका, फिजिओथेरपिस्ट, व्यावसायिक थेरपिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, पोषणतज्ज्ञ, घरपोच आरोग्यसेवा देणाऱ्या संस्था आणि साहाय्यक तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या कंपन्यांची मागणी सातत्याने वाढत आहे. गोवा पर्यटन आणि आरोग्य क्षेत्रात आधीच प्रगत आहे. त्यात वृद्धसेवा क्षेत्राची भर पडल्यास हजारो युवक-युवतींसाठी रोजगार निर्माण होऊ शकतो.
तंत्रज्ञानाचाही योग्य वापर करता येईल. स्मार्ट घड्याळे, आपत्कालीन कॉल बटण, औषधांची आठवण करून देणारी उपकरणे, जीपीएस ट्रॅकर वृद्धांचे जीवन अधिक सुकर करू शकतात. मात्र तंत्रज्ञान हे मानवी सहवासाची जागा घेऊ शकत नाही, हेही तेवढेच खरे. गोव्यात वृद्धांसाठी दिवसभर राहण्याची केंद्रे, अल्पकालीन विश्रांती सेवा, घरपोच भोजन, फिरते आरोग्य दवाखाने आणि मानसिक आरोग्य समुपदेशन केंद्रे विकसित करता येतील. आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यातील संध्याछाया भीतीच्या नव्हे तर सन्मानाच्या, सुरक्षिततेच्या आणि माणुसकीच्या व्हाव्यात, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे