

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा हे राज्य झपाट्याने ज्येष्ठ नागरिकांचे राज्य बनत असून, त्याचबरोबर डिमेन्शिया आणि अल्झायमरसारख्या मेंदूविकारांचे वाढते आव्हानही समोर येत आहे. जनगणनेनुसार राज्यातील सुमारे ११.२ टक्के लोकसंख्या ज्येष्ठ नागरिकांची असून, हे प्रमाण राष्ट्रीय सरासरी ८.६ टक्क्यांपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक आहे. आयुर्मान वाढत असल्याने डिमेन्शियाशी संबंधित आजारांचा भार कुटुंबे, काळजीवाहक आणि आरोग्य व्यवस्थेवर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दोनापावल येथील डॉ. पारुल दुबे यांनी सांगितले की, गोव्यात स्मरणशक्ती कमी होणे, गोंधळणे, विचारशक्ती घटणे अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अल्झायमर आणि इतर प्रकारचे डिमेन्शिया हे राज्यासमोरील महत्त्वाचे सार्वजनिक आरोग्याचे आव्हान ठरू शकते.
वृद्धापकाळातील सामान्य विसराळूपणा आणि डिमेन्शिया यामध्ये मोठा फरक असून, वेळेवर निदान व उपचार अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जून महिना जगभरात 'अल्झायमर आणि मेंदू जागरूकता महिना' म्हणून पाळला जातो. जागतिक आकडेवारीनुसार सध्या ५.५ कोटींहून अधिक लोक डिमेन्शियाने ग्रस्त असून, दर तीन सेकंदाला एका नव्या रुग्णाचे निदान होते.
भारतात ६० वर्षांवरील सुमारे ८८ लाख नागरिक या आजाराने प्रभावित असून, वृद्ध लोकसंख्येच्या सुमारे ७.४ टक्के इतके हे प्रमाण आहे. गेली १५ वर्षे गोव्यात वैद्यकीय सेवा देत असलेल्या डॉ. दुबे यांनी सांगितले की, अल्झायमर हा डिमेन्शियाचा सर्वाधिक आढळणारा प्रकार आहे. डिमेन्शिया म्हणजे स्मरणशक्ती, विचारशक्ती आणि निर्णयक्षमता यांचा हळूहळू होणारा ऱ्हास होय.
हा आजार प्रगत स्वरूपाचा असून कालांतराने अधिक गंभीर होत जातो. ८५ वर्षांनंतर सौम्य विसराळूपणा दिसू शकतो; मात्र तो अल्झायमर नसतो. डिमेन्शियामध्ये स्मरणशक्तीचा -हास दैनंदिन जीवनावर परिणाम करणारा असतो, असे त्यांनी सांगितले. अल्झायमर हा केवळ ८० वर्षांनंतरच होतो, हा समज चुकीचा असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या विभागात येणारे बहुतांश रुग्ण ६० वर्षांवरील असले तरी हा आजार त्यापूर्वीही होऊ शकतो, असे त्या म्हणाल्या.
डिमेन्शियाची सुरुवातीची लक्षणे
डॉ. पारुल दुबे यांच्या मते, अलीकडील घटना वारंवार विसरणे हे या आजाराचे सुरुवातीचे प्रमुख लक्षण आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्ती एकच प्रश्न वारंवार विचारणे, भेटी किंवा औषधांची वेळ विसरणे, रोजच्या वापरातील वस्तू हरवणे, संभाषण समजण्यात अडचण येणे किंवा सकाळी सांगितलेली गोष्ट दुपारपर्यंत विसरणे अशी लक्षणे दिसू शकतात.
तसेच अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान, मद्याचे अतिसेवन, लठ्ठपणा, झोपेचे विकार आणि शारीरिक हालचालींचा अभाव यांमुळे डिमेन्शियाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.