

पणजी; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने दुसर्या टप्प्यात जाहीर केलेल्या ई- लिलाव प्रक्रियेत नोंद केलेल्या पाच खाणपीठाच्या जागेत 12 हजार कोटी रुपये किमतीचे लोहखनिज आहे. खाण खात्याने जाहीर केलेल्या माहितीनुसार, सरकारने दुसर्या टप्प्यात सुर्ला-सोनशी, थिवी- पिर्ण केळ, कुडणे, कुडणे -कार्मोली व वाळपे -थिवी या पाच खाणपीठ (ब्लॉक) चा ई-लिलाव जाहीर केला आहे. त्यासाठी 16 कंपन्यांनी सादरीकरण पाहिले आहे. येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष लिलाव होणार आहे.
या खाणपीठाच्या लिलावानंतर सरकारला दुसर्या फेरीत मोठ्या प्रमाणात महसूल मिळू शकतो. लोहखनिजाच्या पाच खनिज पट्ट्यांसाठी लवकरच बोली प्रक्रिया सुरू होणार आहे, असे खाण आणि भूविज्ञान संचालनालयाने जाहीर केले आहे. खाण खात्याच्या अधिकार्याने सांगितले की, या पट्ट्यांमध्ये 89.2 दशलक्ष टन लोहखनिजाचा साठा आहे.
43 हजार कोटी मूल्यांच्या 137 दशलक्ष टन खनिज साठ्यासाठी ई – लिलावाची पहिली फेरी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पूर्ण झाली होती. पुढील महिन्यात लिलावास जाणार असलेल्या पाच खनिज पट्ट्यांपैकी सर्वात मोठे पाच खनिज पट्ट्यांमध्ये 89.2 दशलक्ष टन साठा आहे.
सुर्ला- सोनशी खाण पट्ट्यात अंदाजे 65.7 दशलक्ष टन साठा आहे. हा पट्टा पूर्वी वेदांंता लिमिटेडचा होता. इतर चार खनिज पट्ट्यांमध्ये थिवी, पिर्ण केळ 1.7 दशलक्ष टन, कुडणे 8.3 दशलक्ष टन, कुडणे -कार्मोल 9.7 दशलक्ष टन आणि थिवी 3.8 दशलक्ष टन खाण माल आहे.