

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील जि.पं.च्या ५० जागांसाठी शनिवारी ७०.८१ टक्के मतदान झाले. १,२८४ मतदान केंद्रावर मतदान झाले. २०२० मध्ये ५६.८६ टक्के मतदान झाले होते. यावेळी ते १३.९५ टक्के जास्त ७०.८१ टक्के झाले. यात सर्वात जास्त लाटंबासेंत ८८.२९ टक्के, तर सर्वात कमी नावेलीत ५५.२९ टक्के झाले.
मतदान प्रक्रियेत कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेने पार पडले. सकाळी थंडी असतानाही अनेक मतदार सकाळी ८ वाजता मतदान केंद्रांवर पोहोचले होते. आजारी किंवा चालता न येणाऱ्या मतदारांना स्वयंसेवक तसेच कार्यकर्ते मतदार केंद्रांवर आणले जात होते. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क मिळालेल्या युवक मतदारांत पहिले मत देण्यासाठी फारच उत्सुकता दिसून आली.
संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जे मतदानाच्या रांगेत होते. त्यांना मतदान करण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे काही जागी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तर काही जागी ७ वाजेपर्यंत मतदान चालले. उत्तर गोव्यातील २५ जागांसाठी १११ उमेदवार आणि दक्षिण गोव्यातील २५ जागांसाठी ११५ असे एकूण ५० जागांसाठी २२६ उमेदवार रिंगणात आहे. २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याने पुढील दोन दिवस उमेदवारांच्या मनात चलबिचल कायम राहणार आहे.
पक्षीय चिन्हावर होत असलेल्या जि.पं. निवडणुकीसाठी भाजप (४० जागा) आणि मगो पक्ष (३ जागा) यांची युती, काँग्रेस (३६ जागा) व गोवा फॉरवर्ड (९ जागा) यांची युती, आम आदमी पक्ष (४२ जागा) आणि रिव्होल्युशनरी गोवन्स-आरजी पक्ष (३० जागा) यांच्यात चौरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे दक्षिण गोव्यात ३ जागी उमेदवार उभे करण्यात आले आहेत.
उत्तर गोव्यात २३, तर दक्षिण गोव्यात ४० असे एकूण ६३ अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी विधानसभा क्षेत्रातील पाळी या जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये दुरंगी लढत होत आहे. सकाळपासून तेथे मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसत होती आणि संध्याकाळपर्यंत ती ८६.५८ टक्केपर्यंत झाली. त्यानंतर लांटबार्से मतदारसंघात राज्यातील सर्वात जास्त ८८.२९ टक्के मतदान नोंद झाले. तर सर्वात कमी मतदान नावेली या सासष्टीतील मतदारसंघात ५५.२९ टक्के झाले.
राज्यातील पालिका वगळून १९१ पंचायत क्षेत्रातील ८,६९, ३६५ मतदारांना जिल्हा पंचायतीसाठी मतदानाचा हक होता. त्यातील ६,१५,५८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे राज्यातील मतदानाची टक्केवारी ७०.८१ टक्के झाली. ग्रामीण भागात जास्त मतदान जिल्हा पंचायतीसाठी पालिका क्षेत्रांतील मतदारांना मतदानांची संधी नसते.
मात्र मतदानाच्या टक्केवारीचा विचार करता निमशहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त मतदान झाले. सकाळी ८ वाजता मतदान सुरू झाले तेव्हापासून पाळी, केरी सारख्या ग्रामीण भागातील जि. पं. मतदारसंघात मतदानाची टक्केवारी जास्त होती. ताळगाव, नावेली सारख्या निमशहरी भागातील मतदारसंघात मतदानाची टक्केवारी सुरुवातीपासून कमी होती.
२०२० मध्ये झाले होते ५६.८६ टक्के मतदान २०२० मध्ये झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत फारच कमी म्हणजे ५६.८६ टक्के मतदान झाले होते. यावेळी त्यात तब्बल १३.९५ टक्के वाढ होऊन ते ७०.८१ टक्के झाले. २०२० मध्ये उत्तर गोव्यात ५८.४३ टक्के व दक्षिण गोव्यात ५५.०० टक्के झाले होते. म्हणून नोटाचा पर्याय नाही
मिनिनो डिसोझा :
मतपत्रिकेवर नोटाचा पर्याय नसल्याने काही मतदारांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. मात्र याबाबत राज्य निवडणुक आयुक्त मिनिनो डिसोझा यांनी सांगितले की पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुकीत नोटाचा पर्याय घालण्यासाठी पंचायत राज कायद्यात बदल करावा लागेल. सध्याच्या कायद्यात तसा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे आम्ही मतपत्रिकेवर नोटाचा पर्याय दिला नाही, असे डिसोझा म्हणाले.