

पणजी : पुढारी वृत्तसेवा
दलातील कोणत्याही अधिकारी किंवा गोवा पोलिस कर्मचाऱ्याकडून शिस्तभंग, गैरवर्तन किंवा कर्तव्यात हलगर्जीपणा झाल्यास त्यावर तत्काळ आणि कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिस महासंचालक (डीजीपी) आलोक कुमार यांनी दिला आहे.
अलीकडील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर डीजीपी यांनी पोलिस दलातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिस्त राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्याच्या वर्तनात चूक, निष्काळजीपणा किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. पोलिस दलातील शिस्त, प्रामाणिकपणा आणि व्यावसायिकता या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
अशा घटना पुन्हा घड्डू नयेत यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या हाताखालील पोलिस कर्मचाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवावे, असे निर्देशही डीजीपींनी दिले आहेत. याशिवाय, सर्व पर्यवेक्षक अधिकाऱ्यांना नियमित देखरेख, प्रभावी नियंत्रण आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलिस दलातील कोणत्याही प्रकारचे अयोग्य किंवा बेशिस्त वर्तन सहन केले जाणार नाही, असे डीजीपींनी स्पष्ट केले. गोवा पोलिसांबद्दल जनतेचा विश्वास कायम राखण्यासाठी पारदर्शकता, जबाबदारी आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.