

Demand to declare 16 May as Black Day in Goa
पणजी : फ्रान्सिस झेवियर यांनी पोर्तुगालच्या राजाकडे गोव्यात इन्विचझिशन लागू करण्याची मागणी करणारे पत्र १६ मे १५४६ रोजी पाठवले होते. त्यानंतर गोव्यात इन्क्विझिशनची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे हजारो हिंदुंची कत्तल करण्यात आली. शेकडो मंदिरे पाडली गेली. त्यामुळे १६ मे हा काळा दिवस घोषित म्हणून करावा.
इन्क्विझिशनचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ठ करावा अशी मागणी हिंदू एकता मंच, गोवा तर्फे करण्यात आली आहे. बुधवारी पणजी येथील आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी केली. या पत्रकार परिषदेला हिंदू एकता मंचचे अध्यक्ष नितीन फळदेसाई, सत्यविजय नाईक, जयेश थळी, सुजन नाईक, अभय सामंत, दिनीन पेडणेकर उपस्थित होते.
फळदेसाई म्हणाले की, इतिहासातील उपलब्ध दस्तऐवज आणि संशोधन यानुसार गोव्यात इन्क्चिझिशनच्या काळात हजारो हिंदूंवर धार्मिक अत्याचार करण्यात आले. अनेक हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले. हा इतिहास नव्या पुढीला कळावा यासाठी पाठ्यपुस्तकात त्याचा समावेश करतानाच गोव्यात त्याचे म्युझीयम तयार करावे.
प्रियोळकर यांनी आपल्या 'द इन्क्विझिशन' या ग्रंथात इन्क्चिझिशनमधील अमानुष शिक्षा प्रकार आणि धार्मिक दडपशाही यांचे विस्तृत वर्णन केले आहे. तसेच फ्रेंच वैद्य आणि प्रवासी चार्लस डेलोन यांनी गोवा इन्क्विझिशनचा अनुभव घेतला असून त्यांच्या लिखाणात त्या काळातील अत्याचारांचे वर्णन आढळते, असेही त्यांनी सांगितले.
जयेश थळी यांनी १६ मे रोजी देशप्रेमी नागरिकांनी काळा दिवस पाळताना दंडाला काळ्या फट्टी बांधाव्यात, असे आवाहन केले तर सत्यविजय नाईक यांनी सरकारने १६ मे हा काळा दिवस जाहीर करण्याची मागणी केली.
हिंदू एकता मंचच्या मागण्या
१६ मे हा दिवस 'गोव्याच्या इतिहासातील काळा दिवस' म्हणून घोषित करावा.
गोवा इन्क्चिझिशनचा इतिहास शालेय आणि महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकांत समाविष्ट करावा
राज्यातील उद्ध्वस्त केलेल्या हिंदूची मंदिरे त्याच जागी बांधावीत
गोव्यात 'गोवा इन्क्चिझिशन' संग्रहालयाची स्थापना करावी
पोप यांनी इन्क्चिझिशनविषयी गोमंतकीय हिंदूंची जाहीर माफी मागावी
१६ मे रोजी सर्व राष्ट्रभक्त नागरिकांनी अंगावर काळी पट्टी बांधून किंवा काळे वस्त्र परिधान करून घटनेचा निषेध करावा