

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मडगाव येथील एकाची २.०९ कोटी रुपयांची सायबर फसवणूक केल्याप्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे पोलिसांच्या पथकाने मयूर वाघे, (वय २५, रा. नालासोपारा, वसई, ठाणे, महाराष्ट्र) याला अटक केली. संशयिताने ट्रेडिंग प्रकरणातून २ कोटी ०९ लाख ७८ हजार ६१२ रुपयांची फसवणूक केली होती.
मडगाव येथील रहिवाशाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, ८ मे २०२६ रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३१९ (२) सहवाचनीय ३ (५) आणि आयटी कायद्याच्या कलम ६६-डी अन्वये संशयितांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता.
संशयित व अन्य साथीदारांनी वेगवेगळ्या समाज माध्यमांमधून तक्रारदाराशी संपर्क साधला आणि "एंजल वन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म " चे प्रतिनिधी असल्याचे भासवून, शेअर बाजारातील गुंतवणुकीवर उच्च परताव्याचा दावा करत त्यांना "ट्रेंडलिटिक" नावाच्या एका बनावट फसव्या ट्रेडिंग अॅप्लिकेशनची ओळख करून दिली.
या आमिषाला बळी पडून, तक्रारदाराने "ट्रेंडलिटिक "वर स्वतःची नोंदणी केली आणि गुंतवणूक सुरू केली. त्यानंतर, त्यांनी त्याला ट्रेडिंगच्या कामांमध्ये मदत करण्यास सुरुवात केली, यावेळी तक्रारदाराला उच्च परताव्याचे खोटे आश्वासन दिले जात होते.
उच्च परताव्याच्या खोट्या बहाण्याने, तक्रारदाराला अनेक व्यवहारांद्वारे वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण २ कोटी ०९ लाख ७८ हजार ६१२ रुपये हस्तांतरित करण्यास भाग पाडले. तांत्रिक तपासानंतर, महाराष्ट्रातील ठाणे येथे एका संशयिताचा शोध घेण्यात आला.
पोलिस उपनिरीक्षक शेर्विन डकोस्टा, पोलिस कॉन्स्टेबल यश कोले व सीताराम नरसे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने ठाण्याला भेट देऊन मयूर वाघे याला अटक केली. वाघे याच्या बँक खात्यात २६ लाख रुपये जमा झाले होते, जे नंतर त्याच्या साथीदारांच्या अनेक खात्यांमध्ये वळवण्यात आले.
पुढील विश्लेष-णात असे उघड झाले की, हे खाते कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा येथील इतर १२ सायबर फस-वणुकीच्या प्रकरणांशी जोडलेले होते. त्यामधून एकूण २.१० कोटी रुपयांची फसवणूक झाली होती.