

म्हापसा : राय-शिवोली येथील एका भाड्याच्या खोलीत झालेल्या थट्टा मस्करीतून स्वतःच्या पोटात सुरी खुपसल्याने एका युवकाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. रोहित प्रवीण जळगावकर (२६, मूळ रा. पुणे) असे त्या युवकाचे नाव आहे.
रोहित हा हैदराबाद येथील मैत्रिणीसोबत राय-शिवोली येथील भाड्याच्या खोलीत राहात होता. दोघेही घरातून ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने नोकरी करत होते. शुक्रवारी सकाळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला.
वादादरम्यान थट्टामस्करी करत रोहितने स्वयंपाकघरातील सुरी उचलली आणि स्वतःच्या पोटात मारून घेण्याची धमकी मैत्रिणीला दिली. ती संगणकावर कंपनीचे काम करत होती. मस्करीतच रोहितने ती सुरी स्वतःच्या पोटात खुपसली.
यामुळे पोटातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला. त्याला शिवोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी रोहितच्या मैत्रिणीला ताब्यात घेऊन तिची जबानी नोंद केली आहे. हणजूण पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून, पोलिस निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे