

पणजी : महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हेच सामाजिक बदलाचे मूळ आहे. ग्रामीण जीवनोन्नती मिशनच्या (लाईव्हलीहूड) विविध योजनांमुळे ग्रामीण भागांतील हजारो महिला स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहेत. राज्यातील 23 हजार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
गोवा राज्य ग्रामीण जीवनोन्नती मिशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय बँकर्स संमेलनाचे उद्घाटन मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
स्वयं सहाय्य गटांमार्फत ग्रामीण महिला आणि नागरिकांना ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्वयंपूर्ण गोवा’ अंतर्गत आर्थिक सक्षम करण्यासाठी राज्यातील बँकांच्या सहाय्याने या मेळाव्याचे आयोजन केले होते.
यावेळी सरकारी अधिकारी, बँकांचे प्रतिनिधी, राज्यातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, जीएसआरएलएम (गोवा स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन) अंतर्गत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवली जात असून, तिच्या माध्यमातून राज्यातील 170 अन्नपूर्णा स्वयंसहाय्य गटांकडून सध्या दरमहा सुमारे 13 लाखांचा व्यवसाय केला जातो.
या योजनेतून महिलांना स्वयंपाक व कॅटरिंग व्यवसायात प्रशिक्षण, सामूहिक अर्थसहाय्य आणि उत्पन्नाची संधी मिळत आहे. राज्यात 3,250 स्वयंसहाय्य गट स्थापन झाले आहेत. त्यांना 365 कोटींपेक्षा अधिक बँक कर्ज देण्यात आले आहे. त्यांना 2,484 कोटींच्या सामुदायिक गुंतवणूक निधीचे वितरण करण्यात आले आहे.
महिलांकडून 90 टक्केपेक्षा जास्त परतफेड होते. यासाठी स्वयं सहाय्य गटांना अधिकाधिक कर्जपुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्या, महिला-केंद्रित वित्तीय उत्पादने रचना करा, डिजिटल साक्षरता व उद्योजकता प्रशिक्षणाचा प्रसार करा. वित्तीय समावेशकता ही केवळ आर्थिक गरज नसून सामाजिक समृद्धीची गुरुकिल्ली आहे. गोव्याच्या प्रत्येक महिला आणि ग्रामस्त्रीला आर्थिकद़ृष्ट्या सक्षम करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.