

पणजी : पणजी ही राजधानी आहे. स्मार्ट सिटी म्हणूनही तिचा विकास झालेला आहे. मात्र, या राजधानीच्या शहरात कशाप्रकारे बेकायदा कृत्ये घडतात, त्याचा पर्दाफाश वीज खात्याचे अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांनी सोमवारी (दि. 30) केला.
पणजी येथील गोविंदा इमारतीजवळ सिवरेज (सांडपाणी) वाहू टँकर येऊन थांबला होता व त्यातील पाणी रस्त्यावरील सिवरेज लाइनचे झाकण काढून त्यात सोडण्याच्या बेतात टँकरचा चालक व मदतनीस होता. त्यावेळेस त्याच बाजूला असलेले काशिनाथ शेट्ये यांनी त्वरित तेथे धाव घेऊन त्यांना थांबविले व तत्काळ प्रसिद्धी माध्यमांना बोलावून हा बेकायदा धक्कादायक प्रकार समोर आणला. शेट्ये यांनी सांगितले की, अशा बेकायदा गोष्टी पणजीत संगनमताने होतात. काहींना कमिशनही दिले जाते. खुद्द पणजी येथील एका हॉटेलचे सिवरेज पणजीतील रस्त्यावरील चेंबरमध्ये सोडणे ही धक्कादायक बाब आहे. यापूर्वी दिवसा व रात्री अनेकवेळा असा प्रकार घडलेला असावा, असा संशय शेट्ये यांनी यावेळी व्यक्त केला. नागरिकांनी पुढे येऊन असे प्रकार उघड करावेत, असे आवाहन शेट्ये यांनी केले.
दरम्यान, टँकरच्या चालकाचे नाव संतोष प्रजापती असे सांगितले गेले. त्याने आपणाला याबाबत वरून आदेश होता; त्यानुसार आपण टँकरमधील सिवरेज या चेंबरमध्ये सोडणार होतो, असे त्याने यावेळी सांगितले.