

पणजी : पुढारी वृत्तसेवा : सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळलेल्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणांवरून आम आदमी पक्षासह (आप) विरोधी पक्षांचे नेते आपल्यावर आणि पत्नीवर बिनबुडाचे आरोप करत आहेत. याविरोधात अब्रुनुकसानीचे खटले दाखल करणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून गोमंतकीय जनतेला लुटणाऱ्यांचा पर्दाफाश आपणच केला. आपण केलेल्या आवाहनानुसार आर्थिक लुबाडणूक झालेल्या अनेकांनी पोलिसांत जाऊन तक्रारी दाखल केल्या. त्यानुसार अशा प्रकरणांतील संशयितांवर कारवाया करण्यात येत आहेत. सरकारी नोकरीत भ्रष्टाचार होऊ नये, यासाठी आपणच राज्यात कर्मचारी भरती आयोगाची स्थापना केली. या आयोगामार्फत सध्या सरकारी खात्यांतील अनेक रिक्त पदे पारदर्शकपणे भरण्यात येत आहेत. त्यामुळे विरोधकांकडे आपल्याविरोधात बोलण्यासाठी इतर कोणतेही विषय नसल्यामुळेच ते सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केलेल्यांच्या प्रकरणांवरून आपल्याला तसेच आपल्या पत्नीला लक्ष्य करत आहेत.
आपली पत्नी राजकारणात सक्रिय आहे; परंतु सरकारच्या कामात तिचा कोणताही सहभाग नाही. ‘आप’सह इतर विरोधी पक्षांचे काही नेते जाणीवपूर्वक तिचा संबंध अशा प्रकरणांशी लावत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना कोट्यवधी रुपयांना लुटणाऱ्या राज्यातील अनेक टोळ्यांचा गेल्या काही दिवसांत पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यात काही सरकारी कर्मचारीही सहभागी असल्याचे समोर आले. यातील अनेकांना अटक होऊन त्यांची जामिनावर सुटकाही झाली आहे.
'आप’च्या गोव्यातील नेत्यांनी दिल्लीतील काही नेत्यांना सोबत घेऊन आपल्यावर, तसेच आपल्या पत्नीवर नाहक आरोप केले आहेत. अबकारी घोटाळ्याच्या आरोपानंतर अटक होऊन जे जामिनावर सुटलेले आहेत, त्यांनी आपल्याला नैतिकता शिकवू नये. कोणतेही पुरावे नसताना आपल्यावर, तसेच आपल्या पत्नीवर आरोप करणाऱ्यांना आपण सोडणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आपण राजकारणात सक्रिय आहे. यावेळी प्रथमच विरोधकांकडून आपल्यावर इतक्या खालच्या पातळीवरचे आरोप झालेले आहेत. सरकारच्या चांगल्या कामांमुळे सैरभर झाल्यामुळेच त्यांच्याकडून अशी आरोपबाजी होत आहे, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी नमूद केले.