

वाळपई : गोव्याचे भाजप सरकार जनताभिमुख आहे. नारी कल्याण, युवा शक्ती कल्याण, किसान कल्याण व गरीब कल्याण तत्त्वावर सरकार काम करीत आहे. केंद्र सरकारच्या पूर्ण पाठिंब्यामुळे राज्याच्या विविध भागांत भरीव योगदान देताना कोणाताही घटक विकासाच्या प्रवाहातून बाहेर राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे व आमदार डॉ. देविया राणे यांच्या प्रयत्नांतून सत्तरी तालुक्यातील विकासाला चालना मिळत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. मोर्ले येथील सभागृहात आयोजित 4 प्रकल्पांच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. आभासी पध्दतीने सदर कामांचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी व्यासपीठावर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार डॉ. देविया राणे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, जिल्हा पंचायत सभासद सगुण वाडकर, जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, राजश्री काळे, भिरोंडा सरपंच उदयसिंग राणे, मोर्ले सरपंच अमित शिरोडकर, केरी सरपंच सुप्रिया गावस, पर्ये सरपंच दीपा नाईक, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, होंडा सरपंच शिवदास माडकर, पिसुर्ले सरपंच देवानंद परब, ठाणे सरपंच नीलेश परवार, गुळेली सरपंच नितेश गावडे उपस्थित होते. केरी वेलनेस सेंटर, केरी आजोबा देवस्थानचे सौंदर्यीकरण, मोर्ले येथील 15 एमएलडी क्षमतेचा नवीन पाणी प्रकल्प व भूमिगत वीजवाहिन्या अशा 107 कोटींच्या विकास योजनांमुळे पर्ये पंचायत क्षेत्रातील विकासात भर पडली आहे. येणार्या काळात लवकरच सावर्डे नवीन पुलाची सुविधा, केरीच्या सौंदर्यीकरणाचा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी दिले. केरी भाग हा गोव्याचे प्रवेशद्वार असल्यामुळे या भागाचे सौंदर्यीकरण गरजेचे आहे. मंत्री राणे व आमदार राणे यांनी या भागाच्या सौंदर्यीकरणचा प्रस्ताव सादर केलेला आहे. या भागात सौंदर्यीकरण केल्यास त्याचा पर्यटनावर सकारात्मक परिणाम होणार आहे. त्यामुळे या संदर्भातील प्रस्तावांना लवकरच मान्यता मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व आमदार डॉ. देविया राणे सातत्याने तालुक्याच्या विकासासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या प्रयत्नोचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कौतुक केले. त्यांच्या प्रयत्नांतून चांगले प्रकल्प या ठिकाणी उभे राहत आहेत. ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण असो किंवा अन्य विकास प्रकल्प. सातत्याने प्रयत्न करून सत्तरी तालुक्यात विकासाच्या अनेक प्रकल्पांना मंजुरी मिळत आहे. यापूर्वी मंजूर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मिश्कीलपणे बोलताना सत्तरी तालुक्यातील जनता सातत्याने आमदार पती पत्नीला प्रेम देत आहे. आपुलकी देत आहेत. त्यांच्या विश्वासालाही आमदार पती-पत्नी पात्र ठरत आहे. तालुक्याच्या जनतेकडून या आमदार पती पत्नींना भरभरून दिले जाणारे प्रेम आमच्याही वाट्याला थोडेसे द्या अशा प्रकारचे मुश्किल वक्तव्य करण्यात आल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
सत्तरी तालुक्यात चांगल्या प्रकारचे प्रकल्प उभे राहावेत. यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करण्यात आले. सत्तरी तालुक्याचा विकास हा एकमेव ध्यास घेऊन जनतेच्या कल्याणासाठी आपण वावरत आहे. सरकारकडून चांगल्या प्रकारचे सहकार्य लाभत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत सातत्याने सत्तरी तालुक्याच्या विकासात अपेक्षित प्रकल्प तत्काळ मंजूर करतात. ‘डबल इंजिन’ सरकारमुळे हे शक्य होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा चौफेर विकास होत आहे. येणार्या काळातही चांगल्या प्रकारचे प्रकल्प उभे करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येतील. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासनाची निश्चितच पूर्तता होईल, असा विश्वास मंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केला. आमदार डॉ. देविया राणे यांचेही भाषण झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात मतदार संघातील जनतेची उपस्थिती होती.
शेतकर्यांना सक्षम करण्याच्या द़ृष्टिकोनातून सरकारने अनेक पावले उचलली आहेत. शेतकर्यांना कृषी क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. राष्ट्रीयीकृत बँका जर शेतकर्यांना सहकार्य करीत नसतील, तर याबाबतच्या तक्रारी तत्काळ शेतकर्यांनी स्थानिक आमदाराकडे करावी. त्यांच्यावर सरकार कारवाई करेल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.