

पणजी : पुढारी वृत्तसेवा
आपले वडील पांडुरंग सावंत हे जनसंघाचे कार्यकर्ते होते. त्यांनी गोव्यात भाजपसाठी अनेक वर्षे कार्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या वडिलांची यापूर्वी कधीही प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. त्यामुळे आपण कुटुंबासह पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानुसार त्यांनी वेळ दिली आणि बुधवारी (दि. २७) दिल्लीत ही भेट पार पडली.
पंतप्रधानांनी आपल्या वडिलांसोबत तसेच पत्नी आणि मुलीसह सुमारे २५ मिनिटे संवाद साधला. हा क्षण आमच्यासाठी अत्यंत अविस्मरणीय ठरला, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. दिल्ली भेटीनंतर पणजी येथे माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ही माहिती दिली.
ते पुढे म्हणाले की, 'माझे वडील गोव्यात जनसंघाचे कार्यकर्ते होते. त्यानंतर त्यांनी भाजपसाठी कार्य सुरू ठेवले. १९७८ मध्ये त्यांनी विधानसमा निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी त्यांना ४०० मते मिळाली होती. या सर्व गोष्टी पंतप्रधानांनी जाणून घेतल्या.
जनसंघ आणि भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आपुलकीने विचारपूस करतात. यावेळी त्यांनी माझ्या वडिलांशी सविस्तर चर्चा केली. तसेच माझ्या मुलीशीही संवाद साधून तिच्या शिक्षणाबाबत आणि भविष्यातील ध्येयांविषयी जाणून घेतले.
या भेटीदरम्यान माझी पत्नी सुलक्षणा सावंतही उपस्थित होती, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. ही भेट म्हणजे एका कुटुंबीयांमधील आपुलकीची चर्चा होती आणि ती कायम स्मरणात राहणारी आहे, असेही त्यांनी नमूद केले.