

पणजी : पुढारी वृत्तसेवा -
अग्निशमन दलाचा परवाना नसल्याच्या कारणावरून पाटो पणजी येथील सोहो क्लब आणि रायबंदर येथील क्लब वाईब्स या आस्थापनांना सील ठोकण्यात आले आहे. ही कारवाई नागरी सेवेच्या वरिष्ठ श्रेणी अधिकारी विवेक नाईक यांच्या नेतृत्वाखालील अंमलबजावणी समितीने केली आहे.
संयुक्त हडफडे येथील बर्च क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांनी जीव गमावला होता. या दुर्घटनेचा तपास दंडाधिकारी समितीमार्फत सुरू करण्यात आला आला असून किनारी भागातील आस्थापनांच्या बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करण्यासाठी नागरी सेवेच्या वरिष्ठ श्रेणी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे.
दरम्यान, तिसवाडी तालुक्यात कारवाई करण्यासाठी नागरी सेवेतील अधिकारी विवेक नाईक यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता आनंद मिश्रा, विशेष विभागाचे पोलिस निरीक्षक विश्वजीत चोडणकर, स्टेशन फायर ऑफिसर धीरज देसाई आणि वीज खात्याचे कार्यकारी अभियंता जुल्येट कारेकर यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. हडफडे येथील अग्नितांडवानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या क्लब्स व इतर आस्थापनांविरोधात मोहीम उघडली आहे.