

पणजी : पुढारी वृत्तसेवा
चिंबल पंचायत क्षेत्रातील कदंब पठार येथील तोय्यार तलाव परिसरातील युनिटी मॉल व प्रशासन स्तंभाची जमीन पूर्ववत करण्यासाठी ग्रामस्थांनी गोवा सरकारला सात दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत कारवाई न झाल्यास पुन्हा नव्याने आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
युनिटी मॉल प्रकल्प रद्द झाल्यानंतर प्रकल्पासाठी करण्यात आलेले भराव, माती टाकणे आणि इतर बदल हटवून तलाव परिसर पूर्वस्थितीत आणण्याची मागणी ग्रामस्थांनी या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी गोविंद शिरोडकर, अजय खोलकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात चिंबलच्या ग्रामस्थांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी नसल्याने गुरुवारी उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांच्याकडे निवेदन सादर केले.
चिंबल ग्रामस्थ शिष्टमंडळाने सादर केलेले निवेदन स्वीकारल्यानंतर उपजिल्हाधिकारी प्रवीण परब म्हणाले की, हे निवेदन वरिष्ठांना दाखविले जाईल व पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे ग्रामस्थांनी कार्यालयाबाहेर जमा होऊ नये, अशी विनंती केली.
यावेळी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अजय खोलकर यांनी सांगितले की, जागा पूर्वस्थितीत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अनेक महिने उलटून गेले तरी तिथे पत्रे लावून करण्यात आलेले संरक्षक कुंपण, केलेले खोदकाम तसेच टाकलेला भराव अजून उचलण्यात आलेला नाही व ही जागा पूर्वस्थितीत करण्यात आलेली नाही. हे काम केव्हा करणार याचा जाब विचारण्यासाठी चिंबल ग्रामस्थ पणजीत जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.
सामाजिक कार्यकर्ते गोविंद शिरोडकर यांनी सांगितले की, युनिटी मॉल रद्द झाला; पण येथील बांधकाम साहित्य जशास तसे आहे. खड्डे बुजवले गेले नाहीत. युनिटी मॉल होणार नसल्याचे सरकार सांगत आहे, त्यामुळे या बदलामुळे सरकारचा निर्णय पुन्हा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात आल्याने लवकरात लवकर येथील जागा पूर्ववत करण्याची मागणी करण्यात येत आहे.