

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील जनगणना १६ नोव्हेंबरपासून सुरू होत असून १६ ते ३० नोव्हेंबर स्वगणना करण्याची संधी नागरिकांना असून १ डिसेंबर ते ४ जानेवारी या काळात सरकारने नियुक्त केलेले ३२७२ शिक्षक किंवा अधिकारी घरोघरी जनगणना करतील, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ५२५ पर्यवेक्षक नियुक्त केले गेले आहेत, अशी माहिती राज्य जनगणना संचालक चेष्टा यादव (आयएएस) यांनी दिली.
यावेळी उपसंचालक स्वेता नंदवाना उपस्थित होत्या. पर्वरी येथील मंत्रालयाच्या कक्षात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत यादव यांनी सांगितले की, स्व-गणना (एसई) १६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या काळात तर लोकसंख्या गणना (पीई) १ डिसेंबर २०२६ ते ४ जानेवारी २०२७ होणार असून त्यानंतर ५ जानेवारी ते ९ जानेवारी २०२७ पर्यंत पुनरावलोकन फेरी होणार आहे. स्वयं-गणना (एसई), ही एक ऑनलाइन सुविधा आहे जी लोकांना त्यांच्या कुटुंबाची माहिती सादर करण्यास सक्षम करते. ऑनलाईन पध्दतीने स्वगणनास करण्याची सोय असून एसई. सेन्सस. जीओव्ही.एन या लिंकवर जाऊन किंवा स्कॅन करुन स्व गणना करता येईल. त्यात ४० प्रश्न असून ते भरावे लागतील. त्यानंतर नियुक्त केलेले शिक्षक व सरकारी कर्मचारी (गणक) घरोघरी भेट देतील.
काही अडचणी असल्यास ते मदत करतील, अपुरे अर्ज भरतील तसेच ज्या लोकांनी ऑनलाईन स्वगणना केलेली नसेल त्यांची प्रत्यक्ष गणना करतील. लोकांची खाजगी माहिती ही गोपनीय ठेवली जाणार आहे. त्यामुळे लोकांनी सविस्तर माहिती गणकांना द्यावी, असे आवाहन यादव यांनी केले.
जनगणना कायदा, १९४८ नुसार जनगणनेसाठी माहिती देणे अनिवार्य आहे. विकास कार्यक्रम आणि धोरणांचे नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये जनगणनेच्या माहितीचे महत्त्व असून 'आमची जनगणना, आमचा विकास' या घोषवाक्याखाली ही मोहीम राबवली जात असल्याचे यादव म्हणाल्या.
घरात नसाल तर...
संपूर्ण कुटुंब सुट्टीवर जात असेल व त्यांनी ऑनलाईन स्वगणना केलेली असेल तर त्यांनी एसई आयडी एका कागदावर लिहून त्यांच्या दारावर चिकटवून जावे. कुटुंबाने स्व-गणना पूर्ण केली नसेल, तर त्यांना त्यांच्या कुटुंबाची अचूक माहिती गणकाला देणे आवश्यक आहे.
भाडोत्री राहणाऱ्यांनी एकाच जागी गणना करावी
गोव्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्यांनी स्वतःच्या मूळ गावी किंवा गोव्यात यापैकी फक्त एकाच जागी जनगणना करावी. दोन जागी करू नये, असे आवाहन यादव यांनी यावेळी केले.