

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्य सरकार नियमानुसार काम करीत आहे. काँग्रेस काळामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यात भूसंपादन करण्यात आले. काँग्रेस काळात गोव्याचा विध्वंस झाला, असा जोरदार आरोप नगर नियोजन खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी गुरुवारी विधानसभेत केले. प्रश्न विचारल्यानंतर मंत्री योग्य माहिती देत नाहीत.
त्यांच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरणे जमिनींचे रुपांतरण करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या मंत्री राणे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार विएगस यांनी प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नाला उत्तर देताना विएगस व राणे यांच्या मध्ये बराच वाद-विवाद झाला. विएगस जे काय बोलतात ते आपल्याला कळत नाही.
ते सभेत बोलल्यासारखे मोठमोठ्याने प्रश्न विचारतात. ही विधानसभा आहे, सभा नाही, याची जाणीव त्यांनी ठेवावी, असे राणे म्हणाले. विएगस यांच्या प्रश्नाला आपण सविस्तर दिलेले उत्तर त्यांनी वाचावी. त्यांनी मुद्देसूद प्रश्न आपणाला विचारावेत. न्यायालयात असलेल्या प्रकरणावर उत्तर आपण देऊ शकत नाही.
तुम्हीच न्यायालयात जाता आणि तुम्ही आमच्याकडे उत्तरे मागता, असे राणे म्हणाले. नगर नियोजन खात्यातर्फे ७१० कोटींचा महसूल सरकारदरबारी जमा केल्याचे सांगून विरोधी नेत्यांना गोव्याचा विकास नको. काँग्रेसने राज्यातील खाणी बंद करून लाखो लोकांना बेरोजगार केल्याचा दावा राणे यांनी केला.