

चावडी : पुढारी वृत्तसेवा
येथील पालिका बाजार संकुलाजवळ एका अज्ञाताने लावलेल्या कचऱ्याच्या आगीत झाडावरील घरट्यासह चिमणीची निष्पाप पिल्ले होरपळून मरण्याची घटना घडली आहे. मानवाच्या निष्काळजीपणामुळे निसर्गातील जीव हकनाक मुकले आहेत. आपल्या मृत पिल्लांच्या शोधात सैरभैर झालेली माता चिमणी अजूनही या परिसरात चिवचिवाट करत फिरत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
चावडी-काणकोण येथील नगरपालिका बाजार संकुलाजवळील कुंपणाबाहेर असलेल्या झाडावर एका पक्ष्याने घरटे बांधले होते. त्यात अंडी घालण्यात आली होती आणि काही दिवसांपूर्वीच त्या अंड्यांमधून पिल्ले बाहेर आली होती. स्थानिक विक्रेत्यांच्या माहितीनुसार, ती पिल्ले रोज घरट्यात चिवचिवाट करत असत.
चिमणी त्यांना परिसरातून पडलेल्या धान्यांचे कण आणून त्यांना भरवत होती. झाडाच्या मुळाशी असलेल्या प्लास्टिक कचऱ्याला अज्ञात व्यक्त्तीने आग लावल्याचे सांगितले जात आहे. ही आग इतकी वेगाने पसरली की संपूर्ण झाड आगीच्या विळख्यात सापडले. घरट्यातील पिल्ले उडण्याइतकी मोठी नसल्याने त्यांना बचाव करता आला नाही आणि ती घरट्यातच मृत्युमुखी पडली.
चिमणीची प्रतीक्षा कायम...
या घटनेनंतरही माता चिमणी दररोज त्या परिसरात येत असल्याचे स्थानिकांचे निरीक्षण आहे. ती वारंवार झाडांवर बसून आपल्या पिल्लांचा शोध घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चिमणीचा पिल्लांसाठीचा आक्रोश येथील व्यावसायिकांनाही अस्वस्थ करणारा आहे. या घटनेप्रश्नी पक्षीप्रेमींनीही चिंता व्यक्त केली आहे. पिल्लांना शोधण्यासाठी घिरट्या घालणाऱ्या चिमणीची चर्चा सध्या बाजार संकुलातील व्यापाऱ्यांमध्ये सुरू आहे.