

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा सरकारचे कर्मचारी डॉ. प्रमोद सावंत आणि निवृत्तीवेतनधारकांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत इस्टापे सिनर्जीस प्रा. लि. या संस्थेसोबत करार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
या कराराअंतर्गत कमावलेल्या वेतनावर आणि निवृत्ती-वेतनावर कर्मचाऱ्यांना आगाऊ रक्कम मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, गोव्यातील विविध कला प्रकारांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि विद्यावेतन देण्यास मान्यतेसह तसेच गोवा पुनर्वसन मंडळात २३ कायमस्वरूपी पदांची निर्मिती करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
डॉ. सावंत यांनी सांगितले की, शास्त्रीय संगीत, भरतनाट्यम, कथ्थक, लोकनृत्य, गोव्याच्या लोककला, नाटक आणि रंगभूमी, दशावतार आणि इतर पारंपरिक कला प्रकारांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड चाचणी घेतली जाईल.
त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क आणि विद्यावेतनासाठी ३६०० रु. ते ९००० रु. पर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल. यासाठी ३० मेपर्यंत अर्ज करायची मुदत आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. ओबीसी विद्यार्थ्यांना गोवा विद्यापीठात पदवीसाठी प्रवेश राखीवता देण्यात आली आहे. सेसा गोवा कंपनीला खाण माल हाताळण्याची परवानगी दिली गेली आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
बहु-उत्पादन प्रक्रिया केंद्रासाठी १ कोटी
मंत्रिमंडळाने शाश्वत विकास गोवा बहु-उत्पादन प्रक्रिया केंद्रांच्या संचालन, व्यवस्थापन आणि देखभालीसाठी गोवा उपजीविका मंचाला (गोवा लाईव्हलीहूड मिशन) अंमलबजावणी संस्था म्हणून मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाला वार्षिक १ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असे डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
कॅसिनो जहाज संख्या वाढवणार नाही
सरकार कोणत्याही नवीन ऑफओअर कॅसिनो जहाजाला परवानगी देणार नाही. मांडवी नदीसह गोव्यातील कोणत्याही भागात नवीन कॅसिनो जहाजांची संख्या वाढवली जाणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले