पणजी : पुढारी वृत्तसेवा
पणजीत शनिवारी झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील ३० जागा जिंकण्याचे लक्ष्य देण्यात आले असून लागलीच कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले. गोवा विधानसभा निवडणुकीला अजून काही महिने बाकी असले तरी भाजपने २०२७ निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.
प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ३० जागा जिंकण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य जाहीर करत पक्षाने निवडणुकीचे रणशिंग फुंकले. ३० जागा जिंकण्यासाठी आजपासून कामाला लागा, असे फर्मानच भाजप कार्यकर्त्यांना सोडण्यात आले. 'मजबूत बुथ विजयाची हमी' हा संदेश देत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे आदींनी प्रत्येक बुथ मजबूत करण्यासाठी अथक परिश्रम घेण्याचे आवाहन केले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवून लोकांना भाजपला मतदान करण्यास तयार करा, त्यासाठी नियोजन करा, असे आवाहन यावेळी उपस्थित सुमारे १९७ राज्य कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यासह राज्यभरातील कार्यकर्त्यांना नेत्यांनी केले.
केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांनी सांगितले की, गोव्यात सरकारविरोधी वातावरण असल्याचा दावा विरोधक करत असले तरी तशी स्थिती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांचा व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोवा सरकारच्या कामाचा प्रचार अधिक प्रभावीपणे करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. शनिवारी (दि. २० रोजी) पणजी येथे भाजपची राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली.
मगोशी युतीबाबत योग्यवेळी निर्णय : दामू भाजपने
४० ही मतदारंसघात आपले काम जोरात सुरू केले आहे. मगोशी युतीबाबत योग्यवेळी निर्णय घेतला जाईल. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन झाल्यानंतर पहिलीच राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक होत असून भाजपने नेहमीच लोकांना नको असलेल्या प्रकल्पाबाबत फेरविचार करण्याचे धोरण स्वीकारले आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांनी केले.
विकसित भारतासाठी सरकार हवे : मुख्यमंत्री
पंतप्रधान मोदी यांनी देशासमोर 'विकसित भारत २०४७'चे ध्येय ठेवले आहे. त्यातून प्रेरणा घेत गोवा सरकार 'विकसित गोवा २०३७'च्या दिशेने वाटचाल करत आहे. विकसित गोवा व भारतासाठी गोव्यात भाजपची सत्ता येणे गरजेचे आहे आणि त्यासाठी हर एक कार्यकर्ता सक्रिय हवा. पायाभूत सुविधा, सामाजिक कल्याण, शाश्वत विकास, नवोपक्रम आणि सर्वसमावेशक प्रगती यावर राज्य सरकारचा भर आहे आणि त्याचे सकारात्मक चित्र गोव्यात दिसत आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.