

Goa Accident
पणजी : बांबोळी महामार्गावर सोमवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. उतारावर एका टँकरने नियंत्रण गमावले, तो दुभाजकावरून पलीकडे गेला व विरुद्ध दिशेने येणाऱ्या रेंट अ कॅबला धडकला. ही टक्कर इतकी भीषण होती की चालकासह दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला.
दिल्लीतील ५२ वर्षीय योगेंद्र सिंग असे मृत्यू झालेल्या एकाचे नाव आहे. धडकेत कार पूर्णपणे चेंगरली गेली. पोलीस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात नेण्यात आले. अतिवेगामुळे टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. अपघातानंतर टँकर बाजूला जात घळणीत कोसळला होता. पुढील तपास सुरू आहे.