

जयपूर : जयपूरच्या हरामडा परिसरामध्ये सोमवारी दुपारी एका भरधाव डंपर ट्रकने 17 वाहनांना चिरडले. या भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून, 18 जण गंभीर जखमी झाले आहेत.
दुपारी एकच्या सुमारास लोहा मंडी परिसरात हा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा डंपर रोड क्रमांक 14 वरून लोहा मंडी पेट्रोल पंपाकडे महामार्गावर जाण्यासाठी निघाला होता. मात्र, त्याचे ब्रेक निकामी झाले असण्याची शक्यता असून चालकाने नियंत्रण गमावल्यानंतर हा ट्रक सुमारे 300 मीटरपर्यंत पुढे धावत गेला आणि त्याने मार्गात येणार्या अनेक वाहनांना धडक दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डंपर रिकामा होता; पण तो खूप वेगाने धावत होता. त्याने प्रथम एका कारला धडक दिली आणि त्यानंतर त्याने अनेक दुचाकी, ऑटो रिक्षांसह इतर वाहनांना चिरडले. काही लोकांचा जागीच मृत्यू झाला, असे हेड कॉन्स्टेबल रवींद्र यांनी सांगितले. अपघाताच्या ठिकाणी रस्त्यावर उसळलेला रक्तस्राव, छिन्नविच्छिन्न झालेली वाहने आणि शरीराचे तुकडे पाहून उपस्थित नागरिकांच्या काळजाचे पाणी झाले होते. स्थानिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. त्यांनी ढिगार्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आणि रुग्णवाहिकांसाठी संपर्क साधला. जखमींना कानवाटिया रुग्णालय आणि एसएमएस ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी ट्रॉमा युनिटमध्ये हलवण्यात आले आहे.
रुग्णालय प्रशासनाने डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचार्यांना तातडीने सतर्क केले आहे. घटनेनंतर हरामडा पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी वाहतूक वळवली. मृतादेह कानवाटिया रुग्णालयाच्या शवागृहात हलवण्यात आले. अपघातग्रस्त डंपर आणि इतर वाहने हटवण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. यामुळे लोहा मंडी आणि व्हीकेआय परिसरात झालेली वाहतूक कोंडी हळूहळू सोडवण्यात आली. स्थानिक नागरिकांनी मात्र लोहा मंडी परिसरात जड वाहनांच्या वाहतुकीवर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली आहे. या अरुंद रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी आणि जड वाहनांमुळे होणारे अपघात वारंवार घडत आहेत.
प्राथमिक तपासानुसार ब्रेक निकामी होणे हे अपघाताचे मुख्य कारण मानले जात आहे. पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे आणि वाहनाची तांत्रिक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.