

प्रियॉळ, फोंडा मतदारसंघांवरून भाजप-मगोत तणाव
विरोधी आघाड्यांमध्येही जागावाटपावरून मतभेद
पणजी : विठ्ठल गावडे-पारवाडकर
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांमधील युतींच्या चर्चांना वेग आला असला, तरी विविध पक्षांच्या नेत्यांच्या वाढत्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षांमुळे अनेक संभाव्य आघाड्या अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. सत्ताधारी भाजप आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगो) यांच्यात प्रियॉळ आणि फोंडा मतदारसंघांवरून मतभेद वाढले असून, काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षातील युतीबाबतही संभ्रम कायम आहे. त्यामुळे नेत्यांच्या निर्णयाकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
मागील विधानसभा निवडणूक आणि जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस व गोवा फॉरवर्ड यांच्यात युती झाली होती. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत अद्याप कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही. गोवा फॉरवर्डने युतीबाबतची चर्चा सध्या 'स्थगित' ठेवल्याने दोन्ही पक्षांमधील संबंधांबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
दुसरीकडे, २०२२ ची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढविल्यानंतर निवडणुकीनंतर भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या मगोने आता फोंडा येथे पक्षाचे स्वतंत्र कार्यालय सुरू केले आहे. त्यामुळे मग आगामी निवडणुकीत फोंडा मतदारसंघातूनही पूर्ण ताकदीनिशी उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली असून, भाजप-मगो युतीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेस आणि आम आदमी पक्ष युतीला अनुकूल असल्याचे बोलून दाखवत असले तरी त्यांच्यातही युती होण्याची शक्यता सध्या धूसर मानली जात आहे. पंजाबमध्ये दोन्ही पक्ष परस्परविरोधी राजकीय भूमिका घेत असल्याने त्याचे पडसाद गोव्यातील राजकारणावरही उमटत असल्याचे मानले जाते. तसेच जागावाटपात अपेक्षित मतदारसंघ काँग्रेसकडून मिळण्याची शक्यता कमी असल्याने 'आप'ही स्वतंत्र भूमिका घेण्याची शक्यता आहे.
आरजी सध्या संघटनात्मक बांधणीवर भर देत असून, तो कोणासोबत युती करणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र आम्ही विरोधी आघाडीत असू असे पक्ष सांगत आहे.
काँग्रेसमध्ये स्वबळावर सत्ता मिळविण्याबाबत आत्मविश्वास असल्याचे बोलले जात आहे. युती झाल्यास इतर पक्षांना मोठ्या प्रमाणात जागा द्याव्या लागतील आणि त्यामुळे स्वतःचे संख्याबळ कमी होईल, अशी पक्षाची भूमिका असल्याची चर्चा आहे. त्यामुळे युतीबाबत काँग्रेसकडून सावध भूमिका घेतली जात असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
गोवा फॉरवर्डने सुमारे दहा मतदारसंघांमध्ये तयारी सुरू केली असून, युती झाल्यास किमान आठ जागांची अपेक्षा पक्षाकडून असल्याचे बोलले जाते. मात्र काँग्रेसकडून इतक्या जागा मिळण्याची शक्यता कमी असल्याने युतीचा मार्ग कठीण मानला जात आहे.
२०२२ मध्ये गोवा फॉरवर्डला तीन जागा दिल्या होत्या. काँग्रेसचे काम नसले तरी काँग्रेस कार्यकर्ते प्रत्येक गल्लीत आहेत.
गोवा फॉरवर्डने गेली पाच वर्षे तशी काही तयारी इतर मतदारसंघांत केलेली नाही. अशावेळी काँग्रेस एकट्या तिप्पट जागा गोवा फॉरवर्डला देईल ही शक्यता कमी आहे. गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्ष आणि आरजी यांनी एकत्र येत तिसरा पर्याय उभा करण्याची शक्यता काही राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. या आघाडीत तिन्ही पक्षांना त्यांच्या पसंतीच्या मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय काँग्रेसमधील एक गट 'गोवा काँग्रेस' या नावानेही या आघाडीत सहभागी होऊ शकतो.
फोंडा मतदारसंघात मगोने नव्याने पक्ष कार्यालय सुरू केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार रितेश रवी नाईक यांना मगोने पाठिंबा दिला होता. मात्र, आता स्वतंत्र कार्यालय सुरू करून मगोने फोंड्यातील संघटनात्मक हालचाली वाढवल्याने आगामी निवडणुकीत तिथून उमेदवार देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले की, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत मगोसोबत युती करायची की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे केंद्रीय नेतृत्व घेईल. फोंडा मतदारसंघातून रितेश रवी नाईक यांनाच पुन्हा संधी मिळावी, अशी स्थानिकांची अपेक्षा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रियॉळ मतदारसंघ हा भाजप आणि मगो यांच्यातील प्रमुख वादाचा विषय ठरला आहे. मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना प्रियॉळमधून पुन्हा निवडणूक लढवायची इच्छा असल्याचे मानले जाते. मात्र, तिथे सध्या गोविंद गावडे हे भाजपचे आमदार आहेत. हा मतदारसंघ सोडण्यास भाजप तयार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे युतीत हा मुद्दा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.