

पणजी : भ्रष्टाचाराच्या आरोपांशी संबंधित प्रकरणात निलंबित करण्यात आलेले पोलिस चालक गौरेश नाईक यांच्या बेतकेकरवाडा, नानूस येथील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने छापा टाकून झडती घेतली. या कारवाईत काही दस्तावेज जप्त करण्यात आले असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरेश नाईक पोलिस विभागात चालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर हळदोणा मतदारसंघाचे आमदार कार्लोस फरेरा यांनी गोवा विधानसभेत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर दक्षता विभागाने या प्रकरणाची दखल घेतली. पोलिस खात्यानेही गंभीर दखल घेऊन नाईक यांना सेवेतून निलंबित केले होते.
या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून एसीबीच्या पथकाने नानूस येथील त्यांच्या निवासस्थानी झडती घेतली. या वेळी कोणती कागदपत्रे किंवा इतर साहित्य जप्त करण्यात आले, तसेच नेमके काय आढळले, याची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. नाईक यांच्या बेहिशेबी मालमत्तेबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. झडतीदरम्यान मिळालेली कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाण्याची शक्यता असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.