

डिचोली : धावसकरवाडा कारापूर येथील दोन गटांत झालेली हाणामारी, प्राणघातक हल्ला या प्रकरणी डिचोली पोलिसांनी धावसकरवाडा कारापूर येथील सर्वेश धावसकर याला अटक केली. डिचोली पोलिस स्थानकात शुक्रवारी सायंकाळी लोक जमत असतानाच पोलिसांनी एकास अटक केली. पोलिस संशयितांच्या शोधात होते. डिचोली पोलिस स्थानकात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झालेल्या असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते गौरीश घाड़ी यांच्यावर कोयत्याने हल्ला करणाऱ्याला अटक करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील विविध सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी डिचोली पोलिस स्थानकात गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत ठाण मांडले होते.
धावसकरवाडा कारापूर येथील युवक एक व कारापूर गावातील युवकांमध्ये झालेल्या वादातून धावसकरवाडा येथील युवकांनी कारापूर गावातील युवकाला धमकी दिल्याचे प्रकरण उग्र झाले. धमकी दिलेल्या धावसकरवाडा येथील युवकास जाब विचारण्यासाठी कारापूर गावातून गेलेल्या युवकांमध्ये जोरदार वादावादी व भांडण झाले व त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. या हाणामारीत कारापूर गावातील सहा जणांना तर धावसकरवाड्यावरील एकास दुखापत झाली होती. पैकी कारापूर येथील लोढा महाप्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनातील पुढारी गौरीश घाडी यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाला. त्याचबरोबर इतरांना लोखंडी सळ्या व दंडुक्यांनी मारहाण झाली. धावसकरवाड्यावरील रामा धावसकर यांच्या डोक्यावर हल्ला झाल्याने त्यांनाही जबर मार बसला.
या प्रकरणानंतर कारापूर येथून आपल्या दुचाकीने गेलेल्या युवकांच्या सुमारे आठ दुचाकींची धावसकरवाडा येथील युवकांनी दंडुके व लोखंडी सळ्यांच्या सहाय्याने तोडफोड करून रस्त्यावर पाडल्या. या प्रकरणाची माहिती मिळतात डिचोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला व घटनास्थळी आढळून आलेले लोखंडी सळ्या, दंडुके व काही हत्यारेही जप्त केली. या प्रकरणात दोन्हीही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी डिचोली पोलिस स्थानकात नोंदविण्यात आल्या.
या तक्रारींवरून गुन्हा नोंद करून घेण्यात आले व त्या दृष्टीने तपासाला डिचोली पोलिसांनी सुरुवात केली. या तपासातून दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वा. च्या सुमारास डिचोली पोलिसांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला करणाऱ्या सर्वेश धावसकर याला अटक केली.
धावसकरवाडा येथील लोकांचे स्पष्टीकरण
डिचोली : धावसकरवाडा कारापूर येथे झालेल्या मारामारीच्या प्रकरणाला पूर्णपणे कारापूर गावातील युवकच जबाबदार असून या प्रकरणाला नाहक वेगळे वळण देण्यात येत आहे. कारापूर येथील युवक धावसकरवाडा येथे आले होते. त्यांनीच सर्वप्रथम शिवीगाळ करून मारहाणीची भाषा करून प्रत्यक्षात मारहाणीस सुरुवात केली. त्यामुळे स्वरक्षणासाठी आमच्या लोकांनी चाल केली असता झटापट झाली. या प्रकरणास पूर्णपणे कारापूर गावातील युवक जबाबदार असून त्यांना अटक करण्यात यावी. अशी मागणी धावसकरवाडा कारापूर येथील लोकांनी केली आहे.
धावसकरवाडा कारापूर येथे गुरूवारी रात्री झालेल्या दोन गटांत मारहाणीत धावसकर कुटुंबातील लोकांवर सामाजिक कार्यकर्ते व इतरांनी केलेले आरोप फेटाळून लावताना या प्रकरणात लोढा प्रकरणाचा कोणताही संबंध नसून गावातील भांडणाला लोढा प्रकरणाचे स्वरूप दिले जात आहे. हे चुकीचे आहे, असे सांगितले.