

पणजी : पुढारी वृत्तसेवा
दक्षता जागृती सप्ताहनिमित्त कारवाईचा भाग म्हणून गोवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी मध्यरात्री पात्रादेवी आणि मोले येथील अबकारी तपासणी नाक्यांवर छापे टाकले. या कारवाईत दोन्ही ठिकाणी १२ हजारांची बेहिशेबी रोकड आढळून आली. छाप्यावेळी चेकनाक्यावरील ड्युटीवरील सर्व कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी एसीबीने समन्स बजावले आहेत.
पात्रादेवी अबकारी नाक्यावर सुमारे २ हजार रुपये, तर मोले नाक्यावर सुमारे १० हजार रुपये रोकड आढळून आली. नाक्यांवर आढळलेल्या या रोकडचा स्रोत काय आहे, ती कोणत्या कारणासाठी ठेवण्यात आली होती आणि या प्रकरणात कोणतीही अनियमितता किंवा गैरप्रकार झाला आहे का, याचा तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.
या कारवाईदरम्यान मिळालेल्या रोकडसंदर्भात कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जाणार असून, चौकशीनंतरच प्रकरणाचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे. एसीबीच्या पुढील तपासातील निष्कर्षाकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दक्षता जागृती सप्ताहनिमित्त खात्यामध्ये बोकाळलेल्या भ्रष्टाचारावर खातेप्रमुखांची कानउघाडणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई यापूर्वीही करून संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करता आला असता मात्र तो केला गेला नाही. दक्षता खाते हे मुख्यमंत्र्यांकडेच आहे.