

मडगाव : गौतम खट्टर यांनी एका कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई तसेच त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी राज्यातील विविध पोलिस स्थानकांत तक्रारी दाखल करण्यात आल्या. वास्कोसह म्हापसा, हरमल, हणजूण, मडगाव येथील पोलिस स्थानकांत तक्रारी नोंद करण्यात आल्या.
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत गौतम खट्टर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयावर मोर्चा काढत तीन निषेध व्यक्त केला. संतांविषयी अवमान करणाऱ्या व्यक्तीला तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाच्या प्रतिनिधीमंडळाने दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांची भेट घेऊन लेखी तक्रार सादर केली. यावेळी खट्टर यांच्याविरोधात वास्को पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याची माहिती देत कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, केवळ गुन्हा नोंद करून न थांबता संबंधितांना तत्काळ अटक करावी, अशी ठाम मागणी नागरिकांनी केली. या पार्श्वभूमीवर 'गोयचो एकवोट 'सह विविध संघटनांनी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्रा क्लिटस यांच्याकडेही तक्रार दाखल केली आहे.
वास्को, म्हापसा, हरमल पोलिस स्थानकावर धडक
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे गौतम खट्टर विरोधात कारवाई करण्यासाठी हणजूण, हरमल, म्हापसा, मडगाव पोलिस स्थानकात तक्रारींची निवेदने देण्यात आली आहेत. खट्टर याला अटक करावी; अन्यथ मोर्चा काढला जाईल, असे पोलिस स्थानकात जमलेल्या आंदोलकांनी सांगितले. वास्को येथे आंदोलकांनी बिनशर्त माफीची तसेच आयोजन समितीने पोलिस स्थानकात जमावासमोर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. दरम्यान, एफआयआर दाखल करण्याची मागणी गोवा कॅथोलिक असोसिएशननेही केली आहे.
योग्य ती कारवाई : अधीक्षक गुरुदास कदम
संशयित गौतम खट्टर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास योग्य दिशेने सुरू आहे. चौकशीनंतर योग्य ती कारवाई होईल, असे पोलिस अधीक्षक गुरुदास कदम यांनी वास्को येथील जमावाला सांगितले. यावेळी मामलेदार प्रविणजय पंडित उपस्थित होते. खट्टर याला ताब्यात घेण्यासाठी बाहेर पथके पाठविण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
नेमके काय घडले?
१८ एप्रिल रोजी खारेवाडो येथील टिळक मैदानावर भगवान परशुराम जन्मोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात गौतम खट्टर वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. ही माहिती समजताच संपूर्ण गोव्यात संतापाची लाट उसळली
'ते' गोव्याबाहेर गेले नसते तर अटक झाली असती- वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पोलिस अक्षीक्षकांची माहिती
वास्को : पुढारी वृत्तसेवा
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गौतम खट्टर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यावर, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक गुरुदास कदम यांनी दिली. त्यांच्या वक्त्यव्याची आम्ही गंभीर दखल घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यापूर्वीच ते गोव्याबाहेर निघून गेल्याने त्यांना अटक करता आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
खट्टर यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते पीटर डिसीझा यांनी लेखी तक्रार केली होती. त्यानंतर सोमवारी त्यामध्ये आणखी पाच तक्रारींची भर पडली. खट्टर यांच्याविरोधात सहा तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्या सर्व तक्रारीची एकत्रितपणे चौकशी करण्यात येणार आहे. पोलिसांनी खट्टर यांच्याविरोधात रविवारी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते गोव्याबाहेर निघून गेल्याचे सांगण्यात आले. तक्रार दाखल करण्यात आल्यावर त्वरित खट्टर यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता, असे कदम यांनी सांगितले, खट्टर यांना ताब्यात घेतल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून काही माहिती उजेडात येईल. वास्को पोलिस इतर गोष्टींचा विविध स्तरावरून चौकशी करीत आहेत, असे कदम म्हणाले.
गोव्याला जातीय सलोख्याचा वारसा लाभला आहे. जिथे सर्व धर्मांचे लोक परस्पर आदराने एकत्र राहतात. समुदायांमध्ये फूट पाडणारी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत.
- दाजी साळकर, आमदार, वास्को,
अशा वक्तव्यामुळे सामाजिक सलोखा बिघडवण्याची शक्यता असते, सर्व धर्मामध्ये एकता आणि परस्पर आदर ही गोव्याची परंपरा आहे.
- माविन गुदिन्हो, मंत्री पंचायत खाते.