

पणजी; पुढारी वृत्तसेवा : श्रावण मास संपला असून हिरवीगार वनराई आणि त्यामुळे प्रसन्न झालेला परिसर अशा या वातावरणात गणरायाच्या स्वागतासाठी गोमंतकिय आतुर झाले आहेत. १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थी असल्याने गणेश चतुर्थीच्या तयारीसाठी नागरिकांची राज्यभर लगबग दिसून येत आहे. गणेशाची आरास करण्यासाठी लागणारे सटावटीच्या वस्तू , कपडे अन्य गरजेच्या वस्तूच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी उसळली आहे. महिला वर्ग मोदक, नेवर्या, लाडू, चकर्या तयार करण्यासाठी व्यस्त झाल्या आहेत. गणेशोत्सवानिमित्त विविध देखावे व आरास करण्यासाठी नागरिकांची तयारी सुरू आहे.
गोव्यामध्ये बहुतांश नागरिकांच्या घरी पाच दिवसाचा गणपती पुजला जातो. या पाच दिवसांमध्ये विविध उपक्रम आयोजित केले जातात. फुगडी, भजन, घुमट आरती यासह इतर विविध लोककलांचे सादरीकरण होते. कुंटूबापासून कामानिमित्त बाहेरगावी असणारे नागरिक गणेशोत्सवमुळे एकत्र येतात. गोव्यात पहिल्या दिवशी गणेशमुर्तीची स्थापना व पूजन झाल्यानंतर दुसरे दिवशी हुनुरबी त्यानंतर विविध कार्यक्रम व पाचव्या दिवशी ओवशे, गौरीपूजन , गौरीविसर्जन व त्यानंतर गणेशमूर्ती विसर्जन होते. काही ठिकाणी यात बदल असतो. काही घरात दीड दिवसाचा गणपती पुजला जातो. काही जागी सात दिवसाचा. मात्र बहुतांश घरात पाच दिवसाची चवथ साजरी होते.
राज्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या महाराष्ट्र व बेळगावच्या मानाने कमी असली, तरी जी गणेशोत्सव मंडळे पारंपारिक गणेशाचे पूजन करून ११ दिवस गणेशोत्सव साजरा करतात. अनंत चतुर्थीला या गणेशमूर्तींचे विसर्जन होते. सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये भजन, फुगडी, लोकनृत्ये, घुमट आरती आदी कार्यक्रम व स्पर्धाचे आयोजन होते. नाटकांचे सादरीकरणही होते.
हेही वाचा :