

पणजी : पुढारी वृत्तसेवा
२०२५ च्या तुलनेत यंदा गोव्यात फ्लूच्या रुग्णसंख्येत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. बालरोगतज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मते, लहान मुलांसह प्रौढांमध्ये विषाणूजन्य ताप, खोकला, सर्दी, घशाचे संक्रमण आणि फ्लू सदृश लक्षणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
पर्वरी येथील सीएमएस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. पिंकी पालयेकर यांनी सांगितले की, नाकातील स्वॅब चाचण्यांसह विविध तपासण्यांमधून निदान झालेल्या फ्लूच्या रुग्णांच्या संख्येवरून ही वाढ स्पष्ट झाली आहे.
"२०२४ मध्ये आम्ही फार कमी रुग्ण पाहिले. २०२५ मध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली, तर यंदा ही संख्या जवळपास दुप्पट झाली आहे," असे त्यांनी सांगितले. विषाणूजन्य फ्लूचे रुग्ण सर्व वयोगटांत आढळत असून, हा संसर्ग केवळ मुलांपुरता मर्यादित नसल्याचेही डॉ. पालयेकर यांनी स्पष्ट केले. संसर्ग झालेली मुले आपल्या आई-वडिलांना आणि आजी-आजोबांनाही विषाणूचा संसर्ग देत आहेत, असे त्यांनी सांगितले.
संसर्गाचे प्रमाण वाढल्याने अनेक पालकांना तीव्र ताप, घशाचा त्रास आणि अंगदुखीमुळे मुलांना काही दिवस शाळेपासून दूर ठेवावे लागत आहे. काही मुलांमध्ये कानदुखी, डोकेदुखी, नाक वाहणे आणि उच्च ताप यांसारखी लक्षणे अचानक दिसून येत असल्याचे पालकांनी सांगितले.
पणजी येथील नवजात, बाल आणि किशोरवयीन सल्लागार डॉ. सुषमा कीर्तनी यांनीही राज्यभरातील दवाखान्यांमध्ये विषाणूजन्य ताप, खोकला, घशात खवखव, पोटदुखी, जुलाब आणि उलट्या यांसारख्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे नमूद केले.
सध्या जिवाणूजन्य घशाच्या संसर्गापेक्षा विषाणूजन्य घशाच्या संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. ताप आणि घशादुखी झाली म्हणजे मुलाला प्रतिजैविकांची (ॲन्टिबायोटिक्स) गरज आहे, असे नाही, असे डॉ. कीर्तनी यांनी स्पष्ट केले. अशावेळी पुरेशी विश्रांती, शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखणे आणि तापावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांना प्रतिजैविे देऊ नयेत, असा सल्लाही त्यांनी दिला. ताप पूर्णपणे उतरेपर्यंत आजारी मुलांना किमान ४८ तास घरीच ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. दीर्घकाळ खोकला असलेल्या मुलांनी शाळेत परतताना मास्कचा वापर करावा, इतर विद्यार्थ्यांपासून योग्य अंतर ठेवावे, असेही त्यांनी सुचवले.
बालरोगतज्ज्ञ डॉ. वर्षा अमोनकर यांनी बालरोग बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सध्या पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे सांगितले. विविध विषाणूंचा प्रसार होत असून, दमट हवामान आणि शालेय मुलांमधील जवळचा संपर्क यामुळे विषाणूजन्य संसर्गाचे प्रमाण वाढल्याचे नमूद केले. संसर्ग टाळण्यासाठी पुरेशी विश्रांती घेणे, भरपूर पाणी पिणे, लक्षणांनुसार उपचार घेणे, हात योग्य पद्धतीने वारंवार धुणे आणि आवश्यकतेनुसार मास्कचा वापर करणे, असे उपाय डॉक्टरांनी सुचवले आहेत.
आरोग्यविषयक सूचना जारी
आरोग्य सेवा संचालनालयाने पावसाळ्यातील श्वसनमार्गाच्या संसर्गाच्या हंगामी स्वरूपानुसार गेल्या काही आठवड्यांत राज्यात इन्फ्लूएंझाच्या (फ्लूएन्झाचा) प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले आहे. देखरेख डेटानुसार जुलै आणि ऑगस्ट २०२६ पर्यंत इन्फ्लूएंझाच्या पॉझिटिव्हिटीमध्ये किंचित वाढ झाली होती, असे आरोग्य सेवा संचालनालयाने कळवले आहे. देखरेख डेटा नुसार, इन्फ्लूएंझा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जूनमध्ये ६ होती.
जुलैमध्ये ४४ पर्यंत वाढली आणि २० ऑगस्टपर्यंत ही संख्या ७३ झाली आहे. आरोग्य सेवा संचालनालयाने जनतेला खालील आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. खोकताना किंवा शिंकताना नाक आणि तोंड रुमालाने झाकावे, श्वसनसंस्थेशी संबंधित लक्षणे जाणवत असल्यास मास्क वापरावा आणि इतरांशी जवळचा संपर्क टाळावा, साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवावेत किंवा अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.