पणजी; पुढारी वृत्तसेवा : पारंपरिक मत्स्यपालनाबरोबरच गोव्यातील नद्यांमध्ये पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन करण्यात येणार आहे. पंतप्रधान मत्स्य संपदा (पीएमएम एसवाय) योजनेंतर्गत चणक व पापलेट सारख्या महागड्या माशांचे संगोपन करण्यासाठी राज्यातील नद्यांमध्ये 22 युनिट्स किंवा पिंजरे उभारले जात आहेत. यासाठी प्रत्येकी 32 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
या योजनेतून सुरक्षिततेसाठीची सामग्री पुरवतानाच जाळी, मासेमारी जहाज आणि मच्छीमारांसाठी विमा प्रदान करण्यात येणार आहे. मच्छिमारांच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी ही योजना उपयोगी ठरणार आहे. ओपन सी केज फार्मिंगमध्ये पिंजर्यांचा वापर करून समुद्रातील माशांचे उत्पादन करणे, तर नदीच्या पिंजर्यात शेतीमध्ये मासे बंदिस्त केले जातील. हे पिंजरे वायर किंवा फायबर जाळीने बांधलेले असतील. नदीत वापरण्यात येणारे पिंजरे गॅल्वनाइज्ड लोखंडाने तयार करण्यात आलेले आहेत.
आयसीएआर-सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट (सीएमएफआरआय), कारवारद्वारे पिंजरा संवर्धनासाठी मदत केली जाणार आहे. 2016-17 मध्ये स्थानिक तरुणांमध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने एक पथदर्शी प्रकल्प सुरू केल्यानंतर आता गोव्यात ओपन सी केज कल्चर, रिझर्व्हॉयर केज कल्चर आणि मॅन्ग्रोव्ह क्रॅब पेन कल्चर हाती घेण्यात आले आहे. यामुळे रोजगार उपलब्ध होणार आहे.