

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निर्देशानुसार मांडवी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेचा अंतरिम अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने सादर केला आहे. तपासणी अहवालात फिकल कोलिफॉर्म जीवाणूंचे प्रमाण अनेक ठिकाणी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे गोव्यातील मांडवी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे.
मांडवी नदीतील पाण्यात प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याचे आणि मलजलाशी संबंधित जीवाणूंची पातळी चिंताजनकरीत्या वाढल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे. उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, मांडवी नदीतील विविध ठिकाणी पाण्याच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्यात आले.
या तपासणीत फिकल कोलिफॉर्म जीवाणूंचे प्रमाण अनेक ठिकाणी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले. हे जीवाणू सामान्यतः सांडपाणी आणि मलजल पाण्यात मिसळल्याचे निष्कर्ष काढण्यात आला आहे. अहवालात नदीतील पाण्याच्या गुणवत्तेवर किनारी भागातील वसाहती, व्यावसायिक उपक्रम, सांडपाण्याचा विसर्ग आणि इतर मानवी क्रियाकलापांचा परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे नदीच्या पर्यावरणीय आरोग्यावर आणि जलस्रोतांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना उच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणांना पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नदी प्रदूषणाची कारणे शोधून त्यावर प्रभावी नियंत्रण आणण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
कृती आराखडा राबविण्याची आवश्यकता
पर्यावरण तज्ज्ञांनी मांडवी नदीतील वाढते प्रदूषण सार्वजनिक आरोग्य आणि जैवविविधतेसाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा दिला असून सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी केली आहे. नदी संवर्धनासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून दीर्घकालीन कृती आराखडा राबविण्याची आवश्यकता असल्याचेही मत व्यक्त करण्यात येत आहे.