

पणजी : पुढारी वृत्तसेवा
उत्तर गोव्यातील हणजूण परिसरात अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) विशेष तपासणी मोहीम राबवत १३ खाद्य व्यवसायांची पाहणी केली. या मोहिमेत रेस्टॉरंट, बेकरी तसेच चिकन कत्तलखान्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्याने एकूण ६ खाद्य व ३ चिकन व्यवसायांवर कारवाई करण्यात आली.
तपासणीत तीन चिकन कत्तलखाने अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत सुरू असल्याचे तसेच त्यांच्याकडे पंचायत आणि आरोग्य विभागाचे आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) नसल्याचे आढळले.
त्यामुळे या तिन्ही कत्तलखान्यांना तत्काळ कामकाज बंद करण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय एक बेकरी आणि दोन रेस्टॉरंट्स यांनाही स्वच्छतेतील त्रुटी दूर होईपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
एफडीए अधिकाऱ्यांनी चार आस्थापनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलाची टोटल पोलर कंपाऊंड (टीपीसी) मीटरद्वारे तपासणी केली. सर्व नमुने निर्धारित मर्यादेत आढळल्याने तेलाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही गंभीर अनियमितता आढळली नाही. मात्र इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका खाद्य व्यवसाय चालकावर १५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला.
ही तपासणी खात्याच्या अधिकाऱ्यांनी संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली केली. एफडीएने स्पष्ट केले आहे की अशा तपासणी मोहीम राज्यभर सुरू राहणार असून अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या खाद्य व्यावसायिकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. नियमांचे सातत्याने उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांचे परवानेही निलंबित केले जाऊ शकतात, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
दक्षिण गोवा एफडीएच्या पथकाने कोलवा आणि फातोर्डा परिसरातील एकूण ८ खाद्य व्यवसायांची तपासणी केली. यामध्ये अस्वच्छ परिस्थितीत सुरू असलेल्या दोन रस्त्यावरील खाद्य गाड्या आणि वैध परवान्याशिवाय तसेच अस्वच्छ स्थितीत सुरू असलेल्या दोन रेस्टॉरंट्सवर एकूण २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. फातोर्डा येथील एका सॉसेज उत्पादन युनिटची तपासणी केली असता तिथे अस्वच्छ आणि अस्वास्थ्यकारक परिस्थिती आढळल्याने संबंधित युनिटला ५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला.