

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात बनावट पोलिस बनून वयोवृद्ध महिला-पुरुषांना गाठत सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत इराणी चोरट्याला कल्याण नजीकच्या आंबिवली इराणी गल्ली परिसरात पहाटेच्या सुमारास सापळा रचून अटक केली.
नाशिकरोड युनिट, गुन्हे शाखा यांनी केलेल्या या कारवाईत तब्बल १० गुन्ह्यांची उकल होऊन एकूण १८ लाख रुपये किमतीचे १२३ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. शहरात गुन्ह्यांचा जलद व प्रभावी तपासासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये नाशिकरोड युनिटची स्थापना करण्यात आली आहे.
बनावट पोलिसांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या पथकाला विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. या कारवाईस पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण व सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांचे मार्गदर्शन लाभले.
उपनगर पोलिस ठाणे हद्दीत दत्त मंदिराजवळ, दीपनगर-शिवाजीनगर परिसरात २० नोव्हेंबरला सकाळी ९.१५ वाजता जुलैखा नजीर शेख (वय ७४, दीपनगर) या घरी जात असताना अज्ञात व्यक्तींनी पोलिस असल्याची बतावणी करून त्यांची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हातचलाखीने लंपास केली होती. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचा तपास नाशिकरोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार करीत होते. इंदिरानगर, उपनगर व नाशिकरोड भागांत वृद्ध नागरिकांना गातून फसवणूक करून दागिने लंपास करण्याच्या घटना वाढल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सदीप पवार यांच्यासह पोलिस हवालदार मंगेश जगझाप, दत्तात्रय चकोर आणि पोलिस शिपाई भरत राऊत यांनी सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली.
त्यातून संशयिताचा फोटो मिळाला. तपासात हा सराईत इराणी टोळीतील असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक माहिती व गुप्त माहिती आधारे सदर संशयिताचे नाव संजू इराणी असून, तो आंबिवलीत राहत असल्याचे समजले. आंबिवलीतील इराणी गल्ली हा भाग कुप्रसिद्ध आहे. संभाव्य विरोध व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी अत्यंत सावधगिरी बाळगत सापळा रचला.
आरोपी पहाटे ४ ते ५ दरम्यान आंबिवली रेल्वेस्थानक परिसरात चहा पिण्यास येतो, अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलिस हवालदार अविनाश देवरे, दत्तात्रय चकोर व मंगेश जगझाप यांनी पहाटे अंधारात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आणि तत्काळ खासगी वाहनाने नाशिकला सुरक्षितपणे आणले,
बनावट पोलिस बनून दहा ठिकाणी महिलांना लुटले
अटक करण्यात आलेला आरोपी जाफर मालिक सय्यद ऊर्फ संजू इराणी (वय ५३, रा. मंगलनगर, अटाळी गाव, ता. कल्याण, जि. ठाणे) याने उपनगर पोलिस ठाणे हद्दीत दत्त मंदिराजवळील गुन्ह्यासह इंदिरानगर, उपनगर व नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत एकूण १० ठिकाणी बनावट पोलिस बनून वयोवृद्ध महिला-पुरुषांना गाठत पोलिस चेकिंग, खून झाला आहे,
नाकाबंदी सुरू आहे अशा थापा देऊन दागिने चोरल्याची कबुली दिली. चोरीतील काही दागिने त्याने अहमदाबाद येथील माणेक चौकात विकल्याचे उघड झाले. पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलिस हवालदार अविनाश देवरे, दत्तात्रय चकोर व मंगेश जगझाप यांनी तेथे जाऊन तसेच आंबिवलीत लपवलेले दागिने हस्तगत केले.
'या' पोलिसांनी बजावली चोख कामगिरी
तपासाची उल्लेखनीय कामगिरी प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलिस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, ग्रेड पोलिस उपनिरीक्षक दिलीप भोई, उपनिरीक्षक मंगला जगताप, पोलिस हवालदार अविनाश देवरे, दत्तात्रय चकोर, मंगेश जगझाप, भरत राऊत यांनी यशस् वीरीत्या केली. तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेच्या जया तारडे व त्यांच्या पथकानेही मदत केली.