

सासष्टी : पुढारी वृत्तसेवा
गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून नावेलीत प्रचार करण्यास हिरवा कंदील दाखविला असल्याचे नावेलीचे माजी जिल्हा पंचायत सदस्य एडविन 'सिप्रू' कार्डोजो यांनी सांगितले.
राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आपण घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सिप्रू यांनी सांगितले. नावेलीतील लोकांनी आपल्यावरील विश्वासाचे श्रेय आपल्या कामाला दिले आहे.
तसेच, मागील जिल्हा पंचायत निवडणुकीत या मतदारसंघातील दोन्ही जागांवर काँग्रेससमर्थित उमेदवार विजयी झाले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तीन वेळा जिल्हा पंचायत सदस्य राहिलेले सिप्रू काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.
वालांका आलेमाव आणि प्रतिमा कुतिन्हो यांच्यासह इतर संभाव्य उमेदवारांबाबत विचारले असता सिप्रू म्हणाले की, काँग्रेसच्या तिकिटावर दावा करणाऱ्या वालांका आलेमाव अद्याप पक्षात सामील झालेल्या नाहीत.
प्रतिमा कुतिन्हो काँग्रेसमध्ये सामील झाल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष चोडणकर यांनी आपल्यालाच नावेलीत प्रचार करण्यास हिरवा कंदील दिला असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
नावेली मतदारसंघात आपण समर्थकांसह प्रचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. मागील विधानसभा निवडणुकीत मतविभाजनाचा परिणाम दिसून आला होता. भाजपविरोधी मते अनेक उमेदवारांमध्ये विभागली गेल्याने भाजपला नावेलीत विजय मिळवता आला, असा दावा त्यांनी केला.
याची पुनरावृत्ती होऊ नये आणि मतांचे विभाजन टाळून काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणावे, अशी इच्छा स्थानिकांनी व्यक्त केल्याचे सिप्रूंनी सांगितले. आपल्याला काँग्रेसचे तिकीट मिळण्याची अपेक्षा असून, तिकीट न मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सिप्रू म्हणाले. विशेषतः आपण आपला जनाधार यापूर्वीच सिद्ध केला असल्याचा दावाही त्यांनी केला.
समर्थक एकजुट दाखवतील : सिप्रू
काँग्रेसने तिकीट नाकारल्यास काय कराल, असे विचारले असता सिप्रू यांनी यावर तातडीने उत्तर देता येणार नसल्याचे सांगितले. सरपंच, उपसरपंच, जिल्हा पंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या आपल्या टीमला काँग्रेसचा असा उमेदवार हवा आहे, जो निवडणुकीत विजय मिळवण्यास सक्षम असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीत मतांची विभागणी होऊ नये आणि मागील परिस्थितीची पुनरावृत्ती टाळली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नावेलीतील काँग्रेस समर्थक पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी एकजुटीने उभे राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.