

पणजी : ई २० पेट्रोलबाबत काही तक्रारी असल्यास त्या नागरी पुरवठा खात्याकडे द्याव्यात. खात्यातर्फे राज्यात विक्री होणाऱ्या पेट्रोलची नियमित लॅब चाचणी, तपासणी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले. आमदार वेंजी व्हिएगस यांनी ई २० पेट्रोलचा मुद्दा लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात मांडला होता. त्याला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार विजय सरदेसाई, आमदार कुज सिल्वा, आमदार वीरेश बोरकर यांनी पाठिंबा दिला.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी ई-२० पेट्रोल सुरक्षित असून वाहनमालक, ऑटोमोबाईल संघटना, वाहतूकदार किंवा गॅरेज चालकांकडून सरकारकडे आतापर्यंत एकही तक्रार प्राप्त झालेली नाही, अशी माहिती दिली. ई-२० पेट्रोलमुळे जुन्या वाहनांवर होणारा परिणाम, तसेच टॅक्सी चालक आणि दुचाकीस्वारांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत आमदार व्हेंझी व्हिएगस, विजय सरदेसाई व कुझ सिल्वा यांनी आज सभागृहात लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचे लक्ष वेधले होते. जुन्या चालकांकडून कोणतीही तक्रार अथवा निवेदन प्राप्त झालेले नाही. असे सावंत यांनी स्पष्ट केले. यावेळी सरदेसाई यांनी ई-२० पेटोलसंदर्भात ज्ञेन झीने निदर्शने केली, असे असताना एकही तक्रार नाही कसे म्हणता असा प्रश्न विचारला.
पेट्रोलची एकही लॅब टेस्टिंग नाही : बोरकर
मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र सरकारकडूनही ई-२० पेट्रोलमुळे इंधन कार्यक्षमता, इंजिनची कामगिरी, देखभाल खर्च किंवा वाहनांच्या विश्वासार्हतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याच्या कोणत्याही व्यापक किंवा ठोस तक्रारी प्राप्त झालेल्या नसल्याचे सावंत यांनी सांगितले. मात्र, त्यावर विरोधी आमदारांनी गोव्यात एक तक्रार झाल्याची माहिती दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी एक तक्रार झाली म्हणून निर्णय कसा बदलायचा, असे विचारले. यावर आमदार वीरेश बोरकर यांनी गेल्या ३ वर्षांत एकाही ठिकाणी पेट्रोलचे लॅब टेस्टिंग झालेले नाही, ते करून घ्या, असे सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आम्ही लॅब टेस्टिंग करायला लावतो, असे सांगितले.
काब्राल यांचे बोलणे जखमेवर मीठ चोळणारे
आमदार विजय सरदेसाई यांनी काब्राल हे आमदार म्हणून नाहीत, तर पेट्रोल पंपाचे मालक म्हणून बोलत आहेत. पेट्रोल पंप मालकांना ई २० काय किंवा स्पीड काय, त्यांना पैसे मिळणारच. मात्र, १०४ रुपयांच्या ऐवजी १६० रुपयांचे पेट्रोल घ्या, असे सांगणे म्हणजे जखमेवर मोठ चोळण्याचा प्रकार असल्याचेही सरदेसाई म्हणाले.
ई २० नको असेल, त्यांनी स्पीड पेट्रोल वापरावे, आमदार नीलेश काब्राल यांची विधानसभेत सूचना
पणजी: विधानसभा सभागृहात ई २० पेट्रोलबाबत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. त्यावर विरोधी पक्षाच्या आमदारांनी ई २० पेट्रोल विरोधात आपले म्हणणे मांडले. मात्र, आ मदार नीलेश काब्राल यांनी ज्यांना ई २० पेट्रोल घ्यायचे नसेल, त्यांनी पॉवर १००, स्पीड १०० पेट्रोल घ्यावे, असे सुचविले ई २० पेट्रोल १०४ रुपयांना मिळते, तर पॉवर आणि स्पीड हे भेसळरहित शुद्ध पेट्रोल २०० रुपयांच्या आत मिळते, ज्यांना ई २० पेट्रोल नको असेल, त्यांनी ते वापरावे, असा सल्ला काब्राल यांनी दिला.
मोटारसायकल पायलट, टॅक्सी चालक यांच्यासाठी सरकारने ईव्ही गाड्या देण्याची स्कीम जाहीर केली आहे. अनेक ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारली आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांच्यावर टीका करण्यापेक्षा ईव्ही गाड्या घेण्यासाठी मोटारसायकल पायलट किंवा टॅक्सीवाल्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन करून काब्राल यांनी ईव्ही वाहनांसाठीचे अनुदान टक्क्यांऐवजी ७० टक्के करावे, असे मांडले.