अद्भुत, भव्य ‘दूधसागर’

अद्भुत, भव्य ‘दूधसागर’
Published on
Updated on

पणजी, स्वालिया न. शिकलगार : निसर्गाच्या कुशीत लपून बसलेला दूधसागर धबधबा या ठिकाणापर्यंत पोहोचणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. दुधासारखा अखंड वाहणारा, चमचमत्या तार्‍यांप्रमाणे जल वाहून नेणारा आणि खळाळत एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाणारा धबधबा म्हणजे 'दूधसागर'. याचा अर्थ स्पष्ट आहे. दूधसागर म्हणजेच दुधाचा धबधबा असं म्हणता येईल. हा धबधबा मोलेेम राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रात आहे. हे ठिकाण अद्भुत, भव्य आणि निसर्गाची ओढ लावणारे आहे.

दूधसागर हा भारतातील पाचवा सर्वात उंच धबधबा आहे. तो 1020 फूट उंचीवरून कोसळतो. गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर हा धबधबा आहे. येथे जाण्यासाठी जवळचे दोन रस्ते आहेत. एक गोव्याहून आणि दुसरा कर्नाटकाहून. दूधसागर धबधबा गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर मांडवी नदीवर स्थित आहे. हा धबधबा जगातील 227 व्या क्रमांकाचा सर्वात सुंदर धबधबा आहे. विदेशी पर्यटकांनाही या धबधब्याची भुरळ आहे.

बॉलीवूड चित्रपटांचे शूटिंग

'चेन्नई एक्स्प्रेस' चित्रपटातील एका भागाचे शूटिंग याच धबधब्यावर झाले आहे. 'चेन्नई एक्स्प्रेस' या चित्रपटामध्ये शाहरूख खान आणि दीपिका पदुकोन यांच्यावर काही द़ृश्ये या धबधब्यावर चित्रीत करण्यात आली होती. उन्हाळ्यात हा धबधबा कोरडा पडतो. मात्र, इतरवेळी हा धबधबा पाहायला जाणे, हे पर्यटकांचे स्वप्न असते.

अनेक बोगदे पार केल्यानंतर रेल्वे दूधसागरच्या रेल्वे पुलाजवळ पोहोचते. बोगद्यातून आणि रेल्वे ट्रॅकवरून धबधब्यापर्यंतचा प्रवास एक थ्रीलचं असतो. आयुष्यभर विसरणार नाही, असा हा प्रवास घडतो. खडकांच्या डोंगरांमधून वाहणारा धबधबा पाहून डोळे दिपतात. दूर अंतरावरून येणारे पाण्याचे फवारे ओलेचिंब करून जातात. एकीकडे धबधबा आणि दुसरीकडे ब्रीजवरून जाणारी रेल्वे, यातून घडणारा प्रवास अवर्णनीय असतो. धबधब्याच्या शिरोमणीवर नजर टाकली की, हे पाणी नेमके येते तरी कोठून? असा प्रश्न आपसूक मनात येतो.

ट्रेकिंगसाठी थ्रील अनुभव

बहुसंख्येने ट्रेकर्स दूधसागर ट्रेक करण्यासाठी येत असतात. कॅसलरॉकपासून 12 किलोमीटर व कुळेपासून 3 किलोमीटरपर्यंत चालत ट्रेकर्स धबधब्याजवळ जातात. तर काही जण रेल्वेतून उतरून जंगल आणि रेल्वे ट्रॅकवरून चालत जातात. दूधसागर धबधब्यापर्यंतचा 16 किलोमीटर ट्रेक पूर्ण करतात. कुळे असो वा कॅसलरॉक ट्रेकर्स रेल्वे ट्रॅकचाच मार्ग निवडतात. रेल्वे रुळावरून इतक्या किलोमीटरचा ट्रॅक पूर्ण करणे ट्रेकर्ससाठी थ्रील असते. ट्रेकर्स दूधसागर धबधब्याला भेट देऊन भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यास भेट देतात. आसपासची छोटी-मोठी ठिकाणे जंगलांनी वेढलेली दिसतात, जी पर्यटक, ट्रेकर्स-तरुणांना आकर्षित करणारी आहेत. त्यात भगवान महावीर अभयारण्य , मोलेम जंगल, तांबडी सुर्ला मंदिर, नेत्रावळी धबधबा यांचा समावेश होतो.

रेल्वेमधून नक्की जा!

निजामुद्दीन एक्स्प्रेस, गोवा एक्स्प्रेस या रेल्वे दूधसागरहून मार्गक्रमण करतात. तुम्हाला या धबधब्याच्या ठिकाणी प्रत्यक्षात जाता येत नसले तरी दक्षिण भारताकडे जाणार्‍या या रेल्वेमधून तुम्ही प्रवास करताना हा धबधबा पाहू शकता. रेल्वेमधून हा धबधबा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news