Actress Divya Shirodkar | दिव्या शिरोडकर : कलेशी बांधिलकी जपणारी अभिनेत्री

Actress Divya Shirodkar | रंगभूमी म्हणजे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही. कलाकाराच्या आयुष्यातील सुख-दुःख बाजूला ठेवून प्रेक्षकांसमोर उभे राहण्याची ती एक साधना आहे.
Divya Deepak Shirodkar
Divya Deepak Shirodkar
Published on
Updated on

रंगभूमी म्हणजे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही. कलाकाराच्या आयुष्यातील सुख-दुःख बाजूला ठेवून प्रेक्षकांसमोर उभे राहण्याची ती एक साधना आहे. पडदा उघडल्यानंतर कलाकाराच्या वैयक्तिक वेदनांना स्थान नसते; समोर असते ती भूमिका, प्रेक्षक आणि कलेशी असलेली बांधिलकी. यांच बांधिलकीचा प्रत्यय युवा अभिनेत्री दिव्या दीपक शिरोडकर तिच्या आयुष्यात आला.

Divya Deepak Shirodkar
CM Pramod Sawant | गोव्यातील स्थानिक कारागिरांना मोठा दिलासा! 'गोवा हाट' अन् 'कुणबी ग्राम'चे डिसेंबरपर्यंत उद्घाटन

नाट्यप्रयोगाच्या अवघ्या दोन दिवस आधी झालेल्या अपघातात तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले. वेदना असतानाही औषधे घेऊन त्याने रंगमंचावर प्रवेश केला आणि भूमिका पूर्ण ताकदीने साकारली. त्या प्रयोगानंतर प्रेक्षकांकडून मिळालेली दाद तिच्यासाठी अविस्मरणीय ठरली.नाटक हाच माझा श्वास आहे. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी रंगभूमीपासून दूर राहण्याचा विचार मी करू शकत नाही, असे दिव्या सांगते.

२९ डिसेंबर २००४ रोजी म्हापसा येथे जन्मलेल्या दिव्या शिरोडकर हिने दुसरीत शिकत असताना 'नाम घेता साई' या नाटकातून रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. बालवयात सुरू झालेला हा प्रवास पुढे तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला.

'शांताबाई डॉट कॉम', 'नाम घेता साई', 'साई', 'गोरा कुंभार', 'बाबा', 'लगीन', 'एक चुटकुला', 'रामशास्त्री', 'रंग आंधळा', 'सुभेदार', 'नवमीच्या मध्यरात्री', 'वन टू का फोर', 'रायगडाला जेव्हा जाग येते', 'नमन नटवरा', 'संभ्रम', 'महाराणी पद्मिनी' अशा विविध नाटकांत त्याने भूमिका साकारल्या आहेत. आजवर तिचे शंभरहून अधिक नाट्यप्रयोग झाले असून गोव्याबरोबर कारवार, हुबळी आणि कणकवली येथेही तिने अभिनयाची छाप पाडली आहे.


विविध नाट्य व एकांकिका स्पर्धांमध्येही दिव्याने यश मिळविले आहे. 'सगळं आहे पण सगळं नाही' या नाटकातील भूमिकेसाठी तिला द्वितीय पारितोषिक मिळाले. महाविद्यालयीन पातळीवरील एकांकिका स्पर्धांमध्येही तिने पारितोषिके पटकावली आहेत. तिने साकारलेल्या विविध व्यक्तिरेखांपैकी 'राणी'ची भूमिका तिच्या विशेष आवडीची आहे. व्यक्तिरेखा केवळ संवाद म्हणून न साकारता त्याची मानसिकता समजून घेऊन रंगमंचावर जिवंत करणे महत्त्वाचे असल्याचे तिचे मत आहे.

दिव्याला अभिनयाची आवड घरातूनच मिळाली. वडील दीपक शिरोडकर यांच्याकडून तिने कलेचा वारसा घेतला. विशेष म्हणजे वडिलांसोबत 'संत गोरा कुंभार' या नाटकात भूमिका साकरण्याची संधीही तिला मिळाली. तिची मोठी बहीण निकिता दीपक शिरोडकर हीदेखील नाट्य आणि नृत्यक्षेत्राशी जोडलेली आहे.


नाट्यक्षेत्रात दक्षता शिरोडकर आणि ममता शिरोडकर यांना ती आपले गुरू मानते. तर नृत्याच्या वाटचालीत प्रेरणा पालीकर यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन ती महत्त्वाचे मानते. गुरूंच्या मार्गदर्शनामुळे अभिनय आणि नृत्यातील बारकावे शिकण्याची संधी मिळाल्याचे ती सांगते.

रंगयात्रा

दिव्याच्या मते रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकाराने केवळ नैसर्गिक अभिनयगुणांवर अवलंबून राहू नये. अभिनयातील तंत्र, संवादफेक, देहबोली, पात्रनिर्मिती आणि रंगमंचावरील वावर यांचा अभ्यासही आवश्यक असतो. अभिनयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतल्याने भूमिका अधिक समजून घेता येते आणि व्यक्तिरेखेतील बारकावे प्रभावीपणे मांडता येतात. त्यामुळे अनुभवासोबत सतत शिकत राहण्याची वृत्ती तिने जपली आहे.


नाटकाच्या प्रयोगातून कलाकाराला केवळ अभिनयाची संधी मिळत नाही, तर प्रेक्षकांना समजून घेण्याचीही संधी मिळते. एखाद्या प्रसंगाला प्रेक्षकांकडून मिळणारी प्रतिक्रिया, संवादावर उमटणारा प्रतिसाद आणि प्रयोगानंतर मिळणारी दाद कलाकाराला स्वतःकडे पाहण्याची नवी दृष्टी देते. दिव्याच्या मते प्रत्येक प्रयोगानंतर कलाकाराने आपल्या कामाचे मूल्यमापन केले पाहिजे. कुठे सुधारणा करता येईल, कोणता संवाद अधिक प्रभावीपणे सादर करता येईल आणि व्यक्तिरेखेतील कोणता पैलू अधिक ठळक करता येईल, याचा विचार केल्याने कलाकाराची प्रगती होते.

गोव्याबाहेरील प्रयोगांमुळेही तिला विविध प्रेक्षकांचा अनुभव मिळाला. कारवार, हुबळी आणि कणकवली येथे सादर केलेल्या प्रयोगांमधून रंगभूमीची भाषा आणि प्रेक्षकांची अपेक्षा वेगवेगळी असली तरी कलेशी जोडलेली भावना समान असल्याचे तिला जाणवले. या अनुभवामुळे स्वतःचा अभिनय अधिक व्यापक पातळीवर पाहण्याची संधी मिळाली.

दिव्याच्या भविष्यातील स्वप्नांमध्ये स्वतः कलाकार म्हणून पुढे जाण्याबरोबर नव्या कलाकारांना घडविण्याचे ध्येय आहे. 'भविष्यत कला शिक्षिका म्हणून संधी मिळाली तर नवीन कलाकार घडविण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन. आपली नाट्य आणि नृत्यकला सातासमुद्रापार पोहोचावी, ही माझी इच्छा आहे. नाट्यकला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवून ती टिकवून ठेवण्यासाठी कलाकारांनी प्रयत्न केलेच पाहिजेत,' असे दिव्या सांगते.

Divya Deepak Shirodkar
Raj Thackeray : "मुंबई- गोवा महामार्गासाठी गडकरींना कॉल केला..." : राज ठाकरे पत्रकार परिषदेत नेमक काय म्‍हणाले?

डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे तरुण पिढीचे मनोरंजनाचे पर्याय बदलले आहेत. अशा काळात रंगभूमीशी तरुणांचे नाते कायम ठेवण्यासाठी दर्जादार नाटकांची निर्मिती आणि नव्या कलाकारांना संधी देणे गरजेचे असल्याचे दिव्या मानते. नाटकातून प्रत्यक्ष प्रेक्षकांसमोर अभिनय करण्याचा अनुभव कोणत्याही माध्यमातून सहज मिळत नाही. रंगमंच कलाकाराला शिस्त, संयम, प्रसंगावधान आणि आत्मविश्वास शिकवतो.


कला शिक्षिका होण्याचे स्वप्न ती पाहते. नव्या कलाकारांना केवळ अभिनय शिकवण्यापेक्षा त्यांच्यात कलेबद्दल आदर आणि रंगभूमीबद्दल निष्ठा निर्माण करणे तिला महत्त्वाचे वाटते. नाट्य आणि नृत्यकलेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला तरच या कला अधिक समृद्ध होतील, असा तिचा विश्वास आहे. भविष्यात चित्रपट क्षेत्रातून संधी मिळाली तर ती स्वीकारण्याची दिव्याची तयारी आहे. मात्र, त्यासाठी रंगभूमीशी असलेले नाते तोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ती ठामपणे सांगते.

पाय फ्रॅक्चर; तरी प्रयोग रंगतदार...

दिव्याच्या रंगभूमीवरील निष्ठेची खरी परीक्षा एका नाट्यप्रयोगाच्या वेळी झाली. प्रयोग अवघ्या दोन दिवसांवर असताना तिचा अपघात झाला आणि पायाला फ्रॅक्चर झाले. चालतानाही वेदना होत होत्या. अशा परिस्थितीत नाटकात भूमिका करणे कठीण होते. मात्र प्रयोग रद्द करण्याचा किंवा भूमिकेतून माघार घेण्याचा विचार तिने केला नाही. वेदना कमी करण्यासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधे घेऊन तिने प्रयोग पूर्ण केला. रंगमंचावर गेल्यानंतर वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून व्यक्तिरेखेला न्याय देण्यावर तिने लक्ष केंद्रित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news