

पणजी : काव्या कोळस्कर
पोर्तुगीज भाषातज्ज्ञ आणि भाषेत पारंगत असलेल्यांची जगभरात मोठी मागणी आहे. मात्र पोर्तुगीज भाषेचे शिक्षण घेणाऱ्यांची संख्या अद्याप म्हणावी तितकी नाही. केवळ दुभाषी म्हणूनच नव्हे तर सध्या प्रसारमाध्यमे, मालिका, आणि चित्रपटांमध्ये देखील पोर्तुगीज भाषातज्ज्ञांना प्रचंड वाव असून प्रभावी करिअर घडवण्यासाठी उत्तम संधी आहे.
गोवा विद्यापीठ हे दक्षिण आशियातील पोर्तुगीज भाषेत शिक्षण देणारे एकमेव विद्यापीठ आहे. त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना गोव्यात शिक्षण घेणे सोयीस्कर असल्याचे भाषातज्ज्ञ सांगतात. राज्यात बेरोजगारी वाढत असताना पालक आणि तरुणांनी जारी मानक अभ्यासक्रमांच्या पलीकडे पाहण्याची आवश्यकता आहे.
अशा परिस्थितीत, पोर्तुगीजसारख्या जागतिक भाषेचे ज्ञान चांगल्या करिअरच्या संधी निर्माण करू शकते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर, बहुराष्ट्रीय कंपन्या पोर्तुगीजमध्ये संवाद साधू शकतील, अशा कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यासाठी आमच्याकडे सतत संपर्क साधत असतात. कारण भारत आणि ब्राझील या दोन वाढत्या अर्थव्यवस्थांमधील व्यावसायिक संबंध मोठ्या वेगाने वाढत आहेत.
कॉर्पोरेट क्षेत्रात भाषांतरांमध्ये काम करू शकणाऱ्या आणि तांत्रिक भाषा समजू शकणाऱ्यांची मागणी मोठी आहे. आमच्या सर्व विद्यार्थ्यांना अमेझॉन, आयबीएम, एक्सेंचर, एम्ब्रेअर, मार्कोपोलो इत्यादी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये भाषा तज्ज्ञ म्हणून काम मिळाले असल्याचे, विद्यापीठातील पोर्तुगीज अध्ययन शाखेचे सहाय्यक प्राध्यापक ध्रुव उसगावकर यांनी पुन्हा एकदा नमूद केले.
मोठी मागणी; केवळ १५ च अनुवादक
स्थानिक पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यावसायिक प्रशिक्षित पोर्तुगीज भाषा तज्ज्ञांसाठी विविध प्रकारच्या कामाच्या अनेक संधी आहेत. गोव्यात स्थानिक पातळीवर अभिलेखागार आणि ऐतिहासिक कागदपत्रे आणि जमिनीच्या कागदपत्रांचे कायदेशीर आणि व्यावसायिक भाषांतर करण्यासाठी, शिक्षकांसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र गोव्यात केवळ १५ च अनुवादक आहेत.