

पणजी : पुढारी वृत्तसेवा अखेर गंगेत घोडे न्हाले ! जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसने युतीची अधिकृतपणे घोषणा केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि गेल्या अनेक दिवसांपासून आघाडी फिस्कटल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस जिल्हा पंचायतीच्या ३६ आणि गोवा फॉरवर्ड ९ जागा लढवणार आहे. एकूण ४५ जागांपैकी ४३ जागांवर दोन्ही पक्षांचे स्वतंत्र उमेदवार उभे राहतील, तर दोन ठिकाणी दोन्ही पक्षांनी आपापला उमेदवार उभा केल्याने दोन्ही जागांवर मैत्रीपूर्ण लढत होईल.
४३ जागा मात्र ते एकत्रितपणे लढवतील. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या मुलाला जिल्हा पंचायतीची उमेदवारी दिल्याने भाजपाने समर्पित कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
आमदार विजय सरदेसाई यांनी भाजपमध्ये इतर पात्र कार्यकर्ते नव्हते का, त्यांच्या मुलालाच खोर्लीमधून जिल्हा पंचायतीची उमेदवारी का दिली, असा प्रश्न केला. हप्ता घेऊन भाजप बीच बेल्ट क्लब चालवते आमदार सरदेसाई यांनी भाजपवर टीका करताना गोव्यातील सर्व क्लब भाजपच्या राजकीय संरक्षणाखाली बेकायदेशीरपणे काम करत असल्याचा आरोप केला. ते हप्ता गोळा करतात आणि बीच बेल्ट क्लब चालवतात असे त्यांनी म्हटले आहे.